Ticker

6/recent/ticker-posts

विनयभंग व मारहाण प्रकरणातील ४ आरोपींना अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर!


विनयभंग व मारहाण केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय,सोलापूर येथून ४ आरोपींना अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर!

सोलापूर : सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने विनयभंग व मारहाण केल्या प्रकरणात अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर केला आहे. अक्कलकोट दक्षिण पोलिस स्टेशन येथे गु.र.क्र. ०२१९/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७६, ११९(१), ३३३, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४) आणि ३(५) अन्वये दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.




सदर गुन्ह्यात आरोपी तुकाराम लालू राठोड,संजय लालु राठोड,दिलीप तुकाराम राठोड व दिपक तुकाराम राठोड (सर्व राहणार : शावळ तांडा,ता.अक्कलकोट,जि. सोलापूर) यांच्यावर फिर्यादी  यांनी विनयभंग,मारहाण,घुसखोरी व तोडफोड केल्याचे आरोप करून तक्रार दाखल केली होती.

फिर्यादीच्या जबाबानुसार,दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०:३० वाजता आरोपी तुकाराम लालू राठोड यांनी घरात घुसून तिचा विनयभंग केला व तिला बाहेर ओढून मारहाण केली. त्यावेळी संजय लालु राठोड,दिलीप तुकाराम राठोड व दिपक तुकाराम राठोड हे सर्वजण घटनास्थळी येऊन फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करू लागले.



घटनेदरम्यान संजय राठोड यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले,तर दिपक राठोड यांनी फिर्यादीच्या मुलास लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. शिवाय आरोपींनी घराच्या दरवाज्याची तोडफोड केली आणि तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपींनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता,या सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की पूर्वीपासूनच अर्जदार आरोपी व फिर्यादी यांच्यात वाद सुरू होते. या वादातून फिर्यादी व तिच्या मुलाला किरकोळ दुखापती झालेल्या आहेत.




सदर घटनेच्या आधीच अर्जदार तुकाराम राठोड यांच्या पत्नीकडून दिनांक १६ मार्च २०२५ रोजी गु.र.क्र. १६१/२०२५ नोंदवला होता. त्यानंतर दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी फिर्यादीकडून सदर तक्रार दाखल झाली असून, आरोपींना खोटेपणाने गुंतविण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास पूर्ण झाला आहे,त्यामुळे फक्त जप्तीच्या कारणावरून आरोपींना अमर्याद काळ तुरुंगात ठेवणे योग्य नाही.

या सर्व युक्तिवादांचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.वी.केंद्रे यांनी दिनांक ३० जुलै २०२५ रोजी आरोपींना अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड. मोहीम पठाण,ॲड.शिवरत्न वाघ आणि ॲड.मनिष बाबरे यांनी काम पाहिले.