विशेष लेख...
राज्य महोत्सव : गणेशोत्सव
गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दैवत व मंगलकार्याचे अधिपती मानले जातात. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्यामागचा उद्देश समाजातील एकता वाढवणे व स्वराज्याच्या लढ्यासाठी लोकांना एकत्र आणणे हा होता. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक,सांस्कृतिक आणि ऐतिहासिकही महत्त्व प्राप्त झाले.
गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एकत्र बांधणारा,संस्कृती जपणारा आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते. राज्याची परंपरा व संस्कृती जपली जाते. ही परंपरा आणि संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपला गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याची 18 जुलै 2025 रोजी विधीमंडळात घोषणा केली. त्यानुसार शासनाने 14 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून जाहीर केले.
गणेशोत्सवाला शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्यानंतर या महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रम आणि इतर कार्यक्रम समन्वयनासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई या कार्यालयाकडे जबाबदारी देण्यात आली.
घरगुती तसेच सार्वजनिक श्री गणेश मंडळे - या गणेशोत्सव काळात घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे'चा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला. यात राज्यस्तरीय प्रथम विजेत्याला रूपये 7.50 लाख तर जिल्हास्तरावरीय प्रथम विजेत्यास रूपये 50 हजार आणि तालुकास्तरीय विजेत्यांना रूपये 25 हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आजमितीस महाराष्ट्रभरातील 404 पेक्षा जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. घरोघरीच्या श्री गणेशांचे दर्शन व सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेशांचे दर्शन घरबसल्या घेणे शक्य व्हावे यासाठी घरगुती व सार्वजनिक श्री गणेशांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या https://ganeshotsav.pldmka.co.in/ या पोर्टलद्वारे मोठ्या संख्येने भाविक आपल्या श्री गणेशांची छायाचित्रे सर्व गणेशभक्तांच्या दर्शनासाठी अपलोड करत आहेत. या पोर्टलद्वारे आजवर 200 हून अधिक जणांनी आपल्या घरच्या व 70 हून अधिक सार्वजनिक मंडळांनी फोटो अपलोड केले आहेत.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणपती मंदिरे व प्रसिद्ध सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे थेट दर्शन जगभरातील गणेशभक्तांना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, याकरिता सुरू करण्यात आलेल्या पोर्टलला देखील गणेशभक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. या पोर्टलमुळे प्रामुख्याने मुंबईचा लालबागचा राजा, मुंबईचा राजा, खेतवाडीचा गणराज, पुण्याचा दगडूशेठ हलवाई, श्री सिद्धिविनायक मंदिरातील सिद्धिविनायकाचे दर्शन, अष्टविनायकांचे व टिटवाळ्याच्या गणपतीचे दर्शन एकाच क्लिकवर उपलब्ध झाले आहे. या दोन्ही पोर्टलमुळे जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या विविध जिल्ह्यातील व शहरातील गणपतींचे अतिशय सुलभ दर्शन होत आहे.
भजनी मंडळ - गणेशोत्सव काळात भजनी मंडळांचा मोठा सहभाग असतो. याच अनुषंगाने राज्यातील नोंदणीकृत तसेच भजन क्षेत्रातील शिखर संस्थांना रूपये 5 कोटी अनुदान देण्याबाबतची तरतूद करण्यात आली. राज्यात 1800 भजनी मंडळे नोंदणीकृत असून त्यांना प्रत्येकी 25 हजार रूपये अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
रील स्पर्धा - गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळावे, यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा राज्यातील महसूल विभागीय स्तर,राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात होत आहे. रील तयार करण्यासाठी पर्यावरण संवर्धन,स्वदेशी,गडकिल्ले, संस्कृती,ऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून 30 सेकंद ते 60 सेकंदापर्यंत रील तयार करावयाची आहे.
महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक 25 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक रुपये 15 हजार, तृतीय पारितोषिक 10 हजार, उतेजनार्थ विजेत्यास 5 हजार अशा स्वरुपात पारितोषिक दिले जाईल. या स्पर्धेतील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 75 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 50 हजार रुपये, उतेजनार्थ पारितोषिक 25 हजार रुपये देण्यात येईल. तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे 1 लाख रुपये बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी 75 हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी 50 हजार रुपये, उतेजनार्थ म्हणून 25 हजार रुपये देण्यात येणार आहे.
विशेष उपक्रम - गणेशोत्सवाच्या 10 दिवसाच्या काळात राज्याच्या प्रत्येक विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत "ऑपरेशन सिंदूर"द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना राबविणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनेस्को मानांकन मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विविध विषय घेऊनही हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. श्री गणेशाला वंदन करण्यासाठी पु.ल.देशपांडे अकादमीकडून ‘आला रे आला… गणराया आला…’ या विशेष गीताचीही निर्मिती करण्यात आली.
जागतिक व्यासपीठ - गणेशोत्सवानिमित्त कलाकारांना महाराष्ट्र राज्याबाहेर देखील व्यासपीठ मिळणार आहे. याचाच एक भाग म्हणून 27 ते 29 ऑगस्ट, 2025 दरम्यान वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आला. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे 1 सप्टेंबर 2025 सांस्कृतिक कार्यक्रम झाला तर 3 सप्टेंबर 2025 रोजी के एम गिरी सभागृह, बेळगाव या सीमावर्ती भागात गणेशोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले. सर सयाजीराव नगर वडोदरा गुजरात या ठिकाणी म्हणजेच 4 सप्टेंबर 2025 रोजी भाग्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 5 सप्टेंबर 2025 रोजी गोवा राज्यात मराठी बांधवांसाठी भव्य संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाला "राज्य महोत्सव" दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात एक भरीव वाढ झाली आहे. लोकसहभाग,डिजिटल प्रसार,आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार, हे नक्की…
सौजन्य - संजय डी.ओरके,विभागीय संपर्क अधिकारी