अगोदर सोलापूरसाठी सक्षम आरोग्य अधिकारी नेमावा...नागरिकांतून मागणी
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेसंदर्भात महत्त्वाची टास्क फोर्स बैठक पार पडली. परंतु ही बैठक घेण्याचा काय फायदा असा सवाल उपस्थित होत आहे. सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी पदी एमबीबीएस एमडी पीएसएम किंवा एमबीबीएस डीपीएच शिक्षण झालेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अन्नल साथीच्या आजारांवर बैठका घ्याव्यात अशी मागणी केली जात आहे. फक्त बैठका घेऊन,नियोजन करून चालणार नाही तर योग्य यंत्रणा,योग्य शिक्षण झालेले अधिकारी सोलापूर पालिका प्रशासनाने नेमावे अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणारे अनेक कर्मचारी बेमुद्दत संपावर आहेत. पालिकेच्या आरोग्य प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे,त्या सर्व अडचणीवर मात करत गोवर आणि रुबेला साथीच्या आजारावर मात करता येईल का असा सवाल उपस्थित होत आहे.
मागील दीड वर्षांपासून सोलापूरचे आरोग्य धोक्यातच आहे. सोलापूर पालिकेला सक्षम आरोग्य अधिकारी नसल्याने सोलापूरकर जीव मुठीत धरून आहेत. आरोग्य अधिकारी पदी नेमणूक होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील उच्च डिग्रीची आवश्यकता नसून साथीच्या आजारावर नियंत्रण,नियोजन,मॅनेजमेंट कसे करावे असे शिक्षण झालेल्याची सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदी नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वशिल्याने सोलापूर क्लिनिकल पोस्टच्या डॉक्टरांकडे शहर आरोग्य अधिकारी पदाचा चार्ज देण्यात आला आहे. प्रशासन अडमुठ भूमिका घेत कोणत्याही डॉक्टराला कोणत्याही पदावर नियुक्त करत असेल तर वेगवेगळ्या पध्दतीच्या शिक्षण प्रणालीचा काय फायदा. यापूर्वी तर अनेक वर्षे फक्त बीएएमएस झालेल्या डॉक्टरांकडे शहर आरोग्य अधिकारी पदाचा पदभार होता. सोलापूर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सोलापूरकर अनेक वर्षांपासून योग्य आरोग्य सेवेपासून वंचितच आहेत.पालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे हे स्वतः डॉक्टर आहेत,त्यांनी सुद्धा आजतागायत शहर आरोग्य अधिकारीपदी सक्षम अधिकारी नेमावा अशी शिफारस राज्य शासनाकडे केलेली नाही.