मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणा सतर्क असावी - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जिल्ह्यातील सर्व गाव व तालुकास्तरीय यंत्रणांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे
सोलापूर : दि.१४ (एमडी२४न्यूज) मान्सून कालावधीत मोठ्या प्रमाणात किंवा मुसळधार पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच जिल्ह्यातील मध्यम व मोठे पाणी प्रकल्प भरल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडल्यानंतर नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती येऊ शकते, त्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा. तसेच सर्व गाव, तालुका व उपविभागीय स्तरावरील यंत्रणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सून पूर्वतयारी 2025 आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, महसूल उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले,उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने,सुमित शिंदे अमित माळी,भूजल चे वरिष्ठ भू वैज्ञानिक शेख,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले,सर्व तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की पूर परिस्थिती हाताळण्यासाठी रचनात्मक उपाययोजना म्हणून मोठे व मध्यम तसेच जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे इन्स्पेक्शन करून आवश्यक दुरुस्ती करावी. तसे नैसर्गिक पाणीसाठे, प्रकल्पाचे कालवे व सांडव्याची आवश्यकता दुरुस्ती करून घ्यावी. संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करावी. एनसीसी, एनएसएस विद्यार्थी आणि स्वयंसेवक, नागरिक यांना प्रथम प्रतिसाद करता दर्जेदार प्रशिक्षण द्यावे. ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच वेळी मास कॉलिंग द्वारे जिल्ह्यातील 1039 गावे आणि चार नगरपरिषदा यातील जवळपास 15 लक्ष नागरिकापर्यंत पूर्व सूचना दिल्या जाऊ शकतात, त्या अनुषंगाने पूर्वतयारी करावी असेही त्यांनी सुचित केले.
जिल्हा नियंत्रण कक्षाशी गाव व तालुकास्तरीय यंत्रणांनी संपर्क ठेवावा. त्याप्रमाणेच ग्राम व तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठका मे महिन्यात घ्याव्यात. संभाव्य पूरस्थिती मध्ये जिल्ह्यातील 105 गावे येतात. या सर्व गावांमध्ये संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने संबंधित तालुकास्तरीय यंत्रणांनी योग्य उपाययोजना करून ठेवाव्यात. विजेपासून होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबत लोकांचे प्रबोधन करावे. जिल्ह्यामध्ये होणाऱ्या सर्व यात्रेचे नियोजन हे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत करावे. सर्व तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीने आपले आराखडे अद्यावत करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्याधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी मान्सून पूर्वतयारी 2025 च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केलेल्या तयारीची माहिती पीपीटी द्वारे दिली. तसेच सर्व संबंधित तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्षांनी त्यांच्याकडील सर्व आराखडे अद्यावत करून व समितीच्या बैठका त्वरित घ्याव्यात. तसेच प्रत्येक शासकीय विभागाच्या जबाबदारीची माहिती त्यांनी दिली.