नाहीतर मी पोलीस उप आयुक्त विजय कबाडे यांच्या घरासमोरच करणार आत्मदहन; प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांचं गृहराज्यमंत्र्यांना निवेदन
सोलापूर : दि.०८ (एमडी२४न्यूज) माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करुन मला संपविण्याचा प्रयत्नात असलेले डीसीपी विजय कबाडे यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. माझ्या जिवीतास काही बरे-वाईट झाल्यास डीसीपी विजय कबाडे हेच जबाबदार असतील. तसेच येत्या काळात माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा जर प्रयत्न झाला तर मी डीसीपी विजय कबाडे यांच्या घरासमोरच आत्मदहन करेन, असा निर्वाणीचा इशारा प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी बुधवारी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेत ' शहर अध्यक्ष' म्हणून कार्यरत असलेल्या अजित प्रभाकर कुलकर्णी यांच्याविरुध्द दोन कोटींची खंडणी मागितली म्हणून हेतुपुरस्सर खोटा गुन्हा दाखल करुन डी.सी.पी. विजय कबाडे यांनी सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातून तडीपार केल्याचं खळबळजनक निवेदन गृह राज्यमंत्री कदम यांच्याकडं सुपूर्द केलं.
प्रहार जनशक्ती पक्षात कार्यरत असतांना सर्वसामान्य नागरिक, दिन-दुबळ्यांना, शेतकरी, शेतमजुर, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अजित कुलकर्णी यांनी लोकशाही पध्दतीने विविध आंदोलने, उपोषणे करीत आले असतांना पोलिस प्रशासनाने माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत.
सोलापूर शहरात अवैध धंद्यांचे पाळेमुळे खोलवर रुजल्याचा प्रहार चा दावा आहे. या अवैध धंद्यांना वेळीच पायबंद घालावा, अशी आग्रही मागणी पत्र व्यवहार करुन पोलिस प्रशासनाला वारंवार जागे करण्याचे काम केले, मात्र पोलिस प्रशासनाकडून कुठल्याही अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली नसल्याचे अजित कुलकर्णी यांनी त्या निवेदनात म्हटलं आहे.
त्याच बरोबर सोलापूर महानगरपालिकेत आरोग्याधिकारीपदी प्रतिनियुक्तीवर आलेल्या डॉ. राखी माने यांच्याविरोधात वारंवार आंदोलन करुन त्यांची आरोग्याधिकारी पदावरुन हकालपट्टी करुन दुसऱ्या आरोग्याधिकाऱ्याची नेमणुक करण्याची एकमेव मागणी घेऊन अजित कुलकर्णी यांनी केलेली आंदोलने चर्चेत राहिली होती.
सोलापूर शहराला सक्षम व पात्रतेचा आरोग्य अधिकारी असावा यासाठी आंदोलने सुरू असतांना पोलिस उप आयुक्त विजय कबाडे यांनी डॉ. राखी माने दोन कोटी रुपये खंडणी मागितल्याचा हेतुपुरस्सर पणे खोटा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग नसतांना केवळ राजकीय द्वेषापोटी विजय कबाडे यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करुन तडीपार केल्याचं कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्तांच्या हजेरीत गृह राज्यमंत्र्यांना सांगितले.
सोलापुरात मटका, गुटखा, सट्टे बाजार, जुगार, राशन धान्याची तस्करी या सर्व गोष्टी बिनबोभाटपणे चालू आहेत, यामागे कोणाचा हात आहे, मटक्याच्या धंद्यात मर्डर होऊन सुध्दा पोलिस प्रशासनाला त्यावर लगाम लावता आलेला नाही, तसेच सोलापूर शहरात राजरोसपणे व बिनदिक्कतपणे अवैध धंदे सुरु असल्याने पोलिस प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने या अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच फावले आहे. हे गोरख धंदे चालू ठेवण्यासाठी पोलिसांचाच 'आशिर्वाद' या अवैध धंदेवाल्यांना नाही ना? अशी शंका त्या निवेदनात व्यक्त करण्यात आलीय.
माझा कुठलाही दोष नसतांना विनाकारण राजकीय सुडबुध्दीने, राजकीय दबावापोटी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करुन डीसीपी विजय कबाडे यांनी माझ्यावर अन्याय केलेला असून अशाच प्रकारे सोलापूर शहरातील अनेक नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना तडीपार करण्यात आलेले आहे.
माझ्या तडीपारीने माझ्या कुटूंबियांवर परिणाम होऊन माझी पत्नी ही आजारी पडली, माझ्या मुलाचे शिक्षणाची अडचण निर्माण झाली, तसेच माझ्या कुटूंबियांना अतोनात मरण-यातना सहन कराव्या लागल्या. माझ्याप्रमाणेच अनेकांचे संसार उद्धवस्त करण्याचे प्रयत्न अविरतपणे सुरू आहेत. अवैध धंदे ज्यांच्या छत्रछायेखाली चालत आहेत, त्यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करणे जरुरीचे आहे.
या सर्व अवैध गोष्टींना पाठीशी घालणारा एकमेव व्यक्ती डीसीपी कबाडे साहेब आहेत, त्यांच्या कारभाराची गोपनिय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असंही अजित कुलकर्णी यांनी म्हटलंय. त्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोलापुरातील अवैद्य धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले.