एमडी२४न्यूज : छत्रपती शिवरायांच्या कालखंडात सिद्धि इब्राहीम,नुरखान बेग,सिद्धि हिलाल यासारख्या अनेक सेनानींनी स्वराज्याची सेवा केली. तीच परंपरा पुढेही चालू राहिली. छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर शाहूराजे जवळपास १६८९ ते १७०७ असे १७ वर्षे मोगलांच्या कैदेत होते. यावेळी छत्रपती राजारामांच्या पत्नी महाराणी ताराराणीनी स्वराज्याचा गाडा पुढे नेला.
२० फेब्रुवारी १७०७ ला अहमदनगर येथे औरंगजेबाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलात गादीसाठी संघर्ष होऊन शहाआलमने मोगलांची सत्ता हाती घेतली. आणि त्यानेच शाहूराजांची सुटका केली. शाहू स्वराज्यात आल्यानंतर महाराणी ताराराणी आणि शाहू यांच्यात खेडची लढाई होऊन यात शाहुंचा विजय झाला. लगेच त्यांनी सातारा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. ताराबाईच्यावतीने सातारच्या किल्ल्याची जबाबदारी परशुरामपंत प्रतींनिधीवर होती. शाहूनी त्यांना किल्ला ताब्यात देण्याचा आदेश दिला. यावेळी शेक मीराची भूमिका महत्वाची राहिलेली आहे.
कोण होता शेख मीरा – शेख मीरा हा मूळचा वाईचा रहिवाशी असून त्याच्याकडे मराठ्यांच्या पायदळातील ६४ जवानांची जमादारकी होती. शाहूनी नोव्हेंबर १७०७ रोजी ज्यावेळी सातारवर आक्रमण केले, तेव्हा शेख मीरा हा सातारच्या किल्ल्याचा हवालदार होता. शाहू महाराजांनी आवाहन करूनही प्रतींनिधींनी किल्ला देण्यास नकार दिला, तेव्हा शेख मीरा अजिंक्यतारा निकराने लढू लागला. यावेळी शाहूनी शेख मिराची मुले माणसे वाईहुन आणून तोफेचा तोंडी देण्याचा धाक दाखवातच शेख मीराने शाहू महाराज हेच आता स्वराज्याचे खरे चालक असून आपण किल्ला त्यांच्या हवाली केला पाहिजे असा सल्ला त्याने प्रतिनिधीला दिला. परंतु प्रतींनिधींनी किल्ला लढवायचा निर्धार कायम ठेवला. तेव्हा शेख मीरा शाहू महाराजांना भेटण्यासाठी गडाखाली आला. त्यांच्याशी खलबते केल्यानंतर किल्ल्यात परत जाताच त्याने प्रतींनिधीलाच अटक करून सातारच्या अजिंक्यतारा किल्ल्याचा दिंडी दरवाजा उघडला. साहजिकच कुठलाही रक्तपात न होता सातारा शाहुंच्या ताब्यात आला. आता खर्याि अर्थाने शाहू महाराजांच्या हातात स्वराज्याची राजधानी आली. या दिवशी शनिवार होता म्हणून पुढे फत्तेची नौबत शनिवारी वाजविण्याचा प्रघात पडला. लगेच १२ जानेवारी १७०८ ला शाहूनी सातारला राजधानी करून आपला राज्याभिषेक करून घेतला. तर या घटनेमुळे शेख मीरा हा शाहूराजांच्या मर्जीतला सेनापती म्हणून गणला जाऊ लागला.
पुढे शेख मिराने अनेक मोहिमेत भाग घेतल्याचे दिसून येते. त्यानुसार १७१८-१९ ला दिल्लीच्या गादीची घडी बसविण्याची जबाबदारी ज्यावेळी छ्त्रपती शाहूनी आपल्या अंगावर घेऊन मराठ्यांची फौज दिल्लीला पाठवली त्या फौजेत खंडेराव दाभाडे,संताजी भोसले,संताजी जाधव, तुकोजी पवार,बाजी कदम,शेख मीरा,शंकराजी मल्हार,नारो शंकर यासारखी मंडळी होती.
यावेळी मोगलांचा एक सेनापती हुसेनअलीसोबत मराठ्यांची फौज दिल्लीत दाखल झाली. यावेळी मोगली दरबारात मोठी गटबाजी चालली होती,मराठ्यांनी हुसेनलीला हाताशी धरून बादशहावर मोठा दबाव आणला होता. याचा सर्वात मोठा फायदा असा झाला की, १६८९ साली औरंगजेबाने अटक केलेली महाराणी येसूबाईसह अनेक मंडळी अद्यापही मोगलांच्या कैदेत होती,त्यांची सुटका करण्यात येऊन मराठ्यांना दक्षिणेतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा मिळाल्या. या निमित्ताने औरंगजेबाने अटक करून सलग ३० वर्षे कैदेत ठेवलेल्या छत्रपती संभाजी राजांच्या परिवाराची सुटका झाली. यावेळी शेख मीरा या मोहिमेत हजर होता हे त्याच्या दृष्टीने विशेष आहे.
यानंतर पुढे १७३६ साली शाहू महाराजांनी जेव्हा जंजीर्यावच्या सिद्दिविरोधात मोहीम हाती घेतली त्यावेळी त्यात उदाजी पवार,बाजी भिवराव,हरी मोरेश्वर राजज्ञा,शेख मीरा हे उपस्थित होते. अशाप्रकारे छत्रपती शाहुंच्या कारकिर्दीत या शेख मिराने स्वराज्याची चाकरी बजावून आपली वेगळी ओळख ठेवली आहे.
छत्रपती शाहू महाराजाकडून शेख मिराला मिळालेला सन्मान – आपल्या सेवेचे बक्षीस म्हणून शेख मीराला वाईजवळील “पसरणी गावाची जहागिरी” इनाम म्हणून देण्यात आली होती. घोडदलातही त्याला वरचा हुद्दा देण्यात आला. तसेच तो निवृत झाला त्यावेळी त्याला १८००० पेन्शन आणि ४०,००० चा मोकासा देण्यात आल्याचे कागदपत्रात नमूद करण्यात आलेले आहे. शेख मिराला सुलतान नावाचा मुलगा व पुढे नातू म्हणून फक्त शेख या नावाचा उल्लेख सापडतो.
इंग्रजी कागदपत्रात त्याचा उल्लेख Waikar Sheikh Meeran याप्रमाणे येतो.
इंग्रजी कागदपत्रात शेख मिरानची छोटी वंशावळही सापडली आहे.
Sheikh Miran --- sultan --- sheikh
Sheikh Miran – khan mahomed ( nephew )- sheikh Miran – Khan mahomed
सद्यस्थिती --- वाईवरुन पाचगणी - महाबळेश्वरला जाताना वाईच्या घाटात उजवीकडे कोराळा ओढ्याकडे सहज नजर मारलीतर एक भव्य असा ऐतिहासिक वाडा दिसतो तोच “शेख मिराचा वाडा” म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला पुढे नबाब बंगला म्हटले गेले. जवळपास २ एकरावर पसरलेल्या वाड्याची रचना पाहिल्यानंतर त्याच्या भव्यतेची कल्पना येते. दिवाणखाना वजा बैठक,नमाजाची खोली,बाजूला घोड्याची पागा,मोटेची विहीर व टेहाळणी बुरूज असा काही सरंजामी थाट या वाड्याच्यारूपाने डोळ्यासमोर उभा राहतो. याविषयी वाईतील स्थानिक अभ्यासक व आमचे मित्र सागर सुतार यांनी या लेखबाबत स्थानिक माहिती तसेच फोटो उपलब्ध करून दिले. मी प्रा.डॉ.सतीश कदम,अध्यक्ष महाराष्ट्र इतिहास परिषद याबाबत त्यांचे आभार व्यक्त करतो.
अलीकडे १९४५ च्या आसपास “नबाब गुलाम जिलानी बिजली खान” हे वाईचे नबाब म्हणून तत्कालीन भारतातील संस्थानात मानमर्ताब राखून होते. त्यांच्या फर्निचर वा इतर कुठल्याही वस्तूवर NW म्हणजेच Nawab of Wai असे लिहिलेले असायचे. सातारच्या छत्रपती घराण्याकडून अगदी १९७०-७५ पर्यन्त कुठल्याही कार्यक्रमाचे आमंत्रण शेख मीरा घराण्याला अगदी सन्मानपूर्वक दिले जायचे. त्यांच्या मुलीचा विवाह भोपाल संस्थानअंतर्गत असणार्याण अरकुटच्या नबाबासोबत झालेला होता. ते या परिसरात खूप गाजलेले व्यक्तिमत्व असून पाचगणीतील शैक्षणिक क्षेत्रात मोठा हातभार लावलेला आहे. माजी प्राचार्य एन.बी.चौधरीसर यांचा या घराण्याशी अगदी जवळचा संबंध आलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पसरणीचा नबाब बंगला आणि त्याच्या बाजूची ३५ एकर जमीन १९७६ ला फक्त २ लाख १० हजारात विकलेली आहे. अलीकडे शेवटचे वारसदार मुहिउद्दीन हे सध्या भोपाळला राहण्यास गेले आहेत.
शेख ते शिर्के असा पसरणीचा इतिहास – छत्रपती शाहू महाराजांच्यारूपाने नावारूपाला आलेला शेख मीराचा प्रवास वाई जवळील पसरणी गावात पोहोचला. ज्या पसरणी गावाने भारताला बी.जी.उर्फ बाबुराव गोविंदराव शिर्केसारखा उद्योगपती दिला. तर कृष्णराव गणपतराव उर्फ शाहीर साबळे हेपण पसरणीचेच. या दोन्ही भूमिपुत्रांनी पद्मश्री मिळवून पसरणी गावची माती पुन्हा उजविली. तर अर्थतज्ञ श्री गजानन दाहोत्रे हे स्टेट बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत.
पसरणीतील नबाब वाड्याबरोबरच शेख मिराच्या वंशजांनी वाई गावात आलीशान हवेलीवजा वास्तु बांधली होती. तिला The Royal Arch म्हटले जायचे. ते काही असो शेख मिरासारखा स्वराज्यावर प्रेम करणारा मावळा खरंच वेगळा होता. म्हणूनच त्याच्या नावाने सातार्याअमध्ये “ शेख मीर्या ची पागा ” अस्तित्वात होती. तर वाईकरांनी आपल्या या मावळ्याचा सन्मान राखत इ.स. १९१६ साली “ शेखमिरा क्लब ” स्थापन करून विविध खेळांना उत्तेजन दिले आहे. तो क्लब आजही त्याच नावाने ओळखला जातो. वाई म्हणजे आदिलशाही सरदार अफजलखानाच्या जहागिरीचे आणि बरेच दिवस वास्तव्याचे गाव तर पेशवाईत विविध सरदारांनी आपला मुक्काम याच गावात ठेवला होता. तरीपण इतिहासाने शेख मीराची आठवण ठेवली आणि आज एका दुर्लक्षित सरदाराचा इतिहास आपल्यापुढे मांडताना वेगळी अनुभूति आल्याशिवाय रहात नाही...
( Dr. Satish Kadam 9422650044
संदर्भ : मराठी रियासत खंड 3, 4.Georg Fores - Bombay Secretariat selected papers डॉ. सदाशिव शिवदे- गड्या व वाडे )