Ticker

6/recent/ticker-posts

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली


वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळी कलाटणी मिळाली. इंग्रजांच्याच अनेक कागदपत्रांतून आणि पत्रांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून त्यांना सर्वाधिक भीती वाटायची,हे स्पष्ट होते. स्वातंत्र्यवीर सावरकर संपूर्ण भारतात बंड उभे करु शकतात,म्हणून त्यांना कारागृहातून बाहेर येऊ देऊ नका,असे उल्लेख मिळतात. स्वातंत्र्यवीर म्हणून अनेक क्रांतिकारक घडवत असताना काळ्या पाण्याच्या दोन शिक्षा एकत्रित झालेले एकमेव नायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. अंदमानच्या कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कणखर बाणा त्यांच्या 'माझी जन्मठेप' या आत्मकथेमध्ये वाचायला मिळतो,असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचे दुसरे पर्व सुरु झाले. यामध्ये त्यांनी जातीभेदाविरोधात लढा उभारला, जात्युच्छेदक निबंध लिहिले,पतितपावन मंदिराच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकालादेखील मंदिर प्रवेशाचा अधिकार आहे,हे सांगितले. यासोबतच आता अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेतील सर्वच महत्त्वाचे शब्द,भाषाशुद्धी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिली,असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथील स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहिली पाहिजे, नवीन पिढीमध्ये विज्ञाननिष्ठा रुजवता आली पाहिजे,यासाठी आपण सर्वच प्रयत्न करु.

यावेळी मंत्री अशोक उईके,राज्यमंत्री पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.