संभाजीनगर : दि.०२( प्रतिनिधी ) निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची तक्रार करत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली यांनी ही तक्रार दाखल केली असून या प्रकरणी शनिवारी कोर्टात सुनावणी झाली. ऐन मंत्रिमंडळ निवडीच्या वेळी सत्तारांविरोधात याचिका दाखल झाल्याने सत्तार अडचणीत आले आहेत.
सिल्लोड प्रथमवर्ग न्यायालयात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात शपथपत्रासंदर्भात दोन याचिका दाखल झाल्या हेित. दोन्ही प्रकरणे त्यांच्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघात अब्दुल सत्तार २४२० मतांनी निवडून आले आहेत. सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली व पुणे येथील डॉ.अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रावर मतदानापूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता. परंतु या आक्षेपावर निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.
सत्तार यांनी शपथपत्रात खोटी,भ्रामक व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. हा लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ च्या कलम १२५ अ नुसार गुन्हा आहे. तक्रारीबाबत आयोगाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे महेश शंकरपेल्ली व डॉ.अभिषेक हरिदास यांनी या प्रकरणात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे.
