Ticker

6/recent/ticker-posts

गृहमंत्र्यांना अनावृत्त पत्र....


           तिरकस अज्ञातसिद्ध

पोलिसांच्या स्वतंत्र टपालाने गृह विभागाकडे जाणाऱ्या थैलीतून पडलेले एक पत्र अज्ञातसिद्धांना बार्शी-सोलापूर या बसमध्ये सापडले आहे. वाचकांच्या करमणुकीसाठी आम्ही येथे देत आहोत.

आदरणीय गृहमंत्री,सागर बंगला,मुंबई


महोदय,अत्यंत गोपनीय माहिती देण्यासाठी है। पत्र लिहीत असल्याने,माझे नाव लिहिणे टाळत आहे,तरीही बक्कल नंबर ४२०, गोपनीय शाखा, एवढेच लिहितो. कुणाच्या हाती चुकून हे पत्र लागले तरी गोंधळ नको. अध्यक्ष महोदय, (सॉरी नुसतेच महोदय) सध्या सोलापुरात अवघ्या ११ मतदारसंघासाठी सुमारे साडेतीनशे जण रिंगणात उतरले आहेत. क्वचित काही ठिकाणी युती आघाडीमधील (दोन्हीकडे कॉमन महा असा शब्द वाचावा) तिकीट वाटपातील गोंधळ किंवा राऊतांच्या भाषेत प्रशासकीय चुकांमुळे बंडखोरी झाली आहे. (ही प्रकरणे निस्ताराल,यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.)



मात्र,हल्ली (हल्ली म्हटले तरी २००५ पासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आशीर्वादाने) माहिती अधिकार कार्यकर्ते नावाची नवी जमात उदयास आली आहे. पूर्वी हे लोक पूनम गेट परिसरात संशयास्पद स्थितीत बसलेले आढळत. तर कधी कधी शासकीय कार्यालयात लोकसेवाकांना माहिती अधिकार कायद्याचा धाक दाखवतात.





या लोकांनी आता आपला मोर्चा विधिमंडळाकडे वळवला आहे. (हे अतिच झाले.) हल्ली ही मंडळी राजकारणात उतरत आहेत. जिल्ह्यात चौघा आरटीआय कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असून, एकाचाही बाद झाला नाही. (तसे हे लोकं अर्ज लिहिण्यात हुशारच असतात) यापैकी एकास आम्ही निवडणुकीपूर्वीच तडीपार केले होते. तरीही त्याने अर्ज दाखल केला आहे. उर्वरित तिघांपैकी दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव घाईगडबड करून आम्ही वरिष्ठांकडे पाठवला. आपले निकटवर्तीय भाऊंच्या प्रयत्नाने मंजूर देखील झाला. त्यासाठी क्रमांक एकचे सदाशिवराव भाऊ यांचे सहकार्य लाभले. (युद्धानंतर या दोन्ही भाऊचे पानिपत होऊ नये, याची कृपया काळजी घ्यावी.) दळवी आणि जाधव नावाचे बार्शीकडचे हे कार्यकर्ते आहेत. त्या दोघांनाही सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. अजून कोणास हद्दपार करायचे बाकी असल्यास त्वरित यादी पाठवा. लागोलग तडीपारीची नोटीस काढून देऊ. सोलापूर विभागात हल्ली तडीपार करण्याच्या नोटिसा काढणे व प्रस्ताव पाठविणे, यासाठी कंत्राटी तत्त्वावर वाढीव मनुष्यबळ घेण्यात आलेले आहे. त्यामुळे गृह विभागाच्या कामाचा ताण वाढेल वगैरे चिंता करू नये. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या तारखेच्या आत उर्वरित यादीतील सर्वांना तडीपार करण्यात येईल.   कळावे,बक्कल नंबर ४२०

सौजन्य  - सकाळ दैनिक