Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात वाळू माफियांचा हैदोस;ग्रामपंचायत सदस्याला जबर मारहाण

ग्रामपंचायत सदस्याची शुध्द हरपली;अजूनही कोमात

महसूल प्रशासन मात्र चिडीचूप

सोलापूर : दि.२४ (एमडी24न्यूज)  बार्शी तालुक्यातील खांडवी गावचे ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी यांनी गावाजवळच्या  ओढ्याच्या पात्रातील अवैध वाळूचे उत्खनन करण्यास विरोध केला होता. अज्ञात वाळू माफियांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशनने या घटनेची नोंद घेतली असली तरी सदर प्रकरणातील जखमी दळवी हे बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवला गेला नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्यात आलेली नाही. दरम्यान महसूल प्रशासन या सर्व प्रकरणावरून चिडीचूप्प आहे. त्यांनी या घटनेची अद्याप कुठलीही दखल घेतली नाही.

ग्रामपंचायत सदस्याने वाळू उत्खननाचा व्हिडीओ प्रसारित केला होता - आकाश पांडुरंग दळवी हे खांडवीचे ग्रामपंचायत सदस्य असून माहितीचा अधिकार चळवळीतील कार्यकर्ते आहेत. दळवी यांनी दि. १९ जून रोजी मध्य रात्री 1 वाजता गावाजवळील ओढ्याजवळून जात होते.ओढ्यात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे पाहून आकाश दळवी यांनी ताबडतोब सर्व हालचाली मोबाईल मध्ये चित्रीकरण केले आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

अवैध वाळू उपसा करणाऱ्याना अडविण्याचा प्रयत्न - खांडवी गावचे ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांना अडविण्याचा प्रयत्न केला होता.वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर चालक व जेसीबी चालक हे आपली वाहने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता,त्यावेळी आकाश दळवी यांनी वाळू माफियांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.

वाळू माफियांनी रस्त्यावर ग्रामपंचायत सदस्यास बेदम मारहाण केली - वाळू माफियांनी आकाश  दळवी यांना रस्त्यावर जबर मारहाण केली.या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्य आकाश यांच्या डोक्याला व हातापायांना जबर मार लागला,या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.वाळू माफियांनी ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण केल्याने बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

ग्रामपंचायत सदस्य बेशुद्ध असल्याने फिर्याद नोंद नाही - आकाश दळवी हे जखमी झाल्यापासून अजूनही बेशुद्ध आहेत.जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवीवर उपचार सुरू आहे.बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी फिर्याद घेण्याचा प्रयत्न केला होता,पण बेशुद्ध असल्याने काहीही नोंद झाली नाही.ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकांना संशयित आरोपीबाबत काहीही माहिती नाही.मंगळवारी आकाश दळवीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

बार्शीमधील अवैध व्यवसायिकांविरोधात आवाज उठविला होता - खांडवी गावचे ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.यांनी चार दिवसांपूर्वी बार्शीचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना बार्शी तालुक्यातील शहर व पांगरी तसेच वैराग येथील पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तीन वर्षात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून या प्रकारांना आळा घालण्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनामध्ये तालुक्यातील मटका, जुगाराचे अड्डे,अवैध गौण खनिज उत्खनन,गांजा व तत्सम अमली पदार्थांची वाहतूक,रेशिलिंग धान्याचा काळा बाजार आदी अवैध व्यवसाय यावर कारवाई करावी असे म्हटले होते.निवेदन देऊन चार दिवस उलटल्यानंतर हा हल्ला झाला.