विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर सोलापूर विकास मंच करत आहे अविरत अभ्यासपूर्ण पाठपुरावा
सोलापूरच्या विकासात तथा होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को-जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकाम जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत तत्परतेने पार पडलेल्या बद्दल सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचने आभार मानले. विमानसेवा नसल्याने सोलापूरकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले,लाखो तरुणांना नोकरी आणि व्यवसाया निमित्त कायमस्वरूपी सोलापूर सोडून नाईलाजाने भाग पडल्याची कैफियत निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या कडे मांडली.
श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची - को-जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी ही मानसिक आणि आर्थिक गुलामगिरीचे स्तंभ म्हणून जगभरात ख्याती मिळवली होती, सोलापूरच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने ती पाडुन सोलापूरकरांची आर्थिक आणि मानसिक गुलामगिरीतुन सुटका केल्याबद्दल सोलापूरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. चिमणी पाडकाम झाल्यावर सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी तात्काळ हालचाल सुरू केल्या असुन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. ह्या वेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा,गणेश पेनगोंडा,गणेश शिलेदार,गौरी आंमडेकर, आरती आरगडे,भारती मनसावाले,कविता मिरगाळे,विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.