सोलापूर : दि.०७ (प्रतिनिधी) कौतुक ही केलेल्या कामाची पावती असून अशा समारंभातून चेतना प्राप्त होऊन भविष्यात जोमाने काम करण्याची उर्जा मिळते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ.शब्बीर अहमद औटी यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "आम्ही 75" एक अभिनव सोहळा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश नरेंद्र जोशी यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ.औटी बोलत होते. यावेळी कायदेविषयक ध्वनिचित्रफित, सोलापूरचे स्वातंत्र्यातील योगदान यावर ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. 26 ऑगस्टला वाहतुकीचे नियमाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने मानवी साखळी,फेरी आणि पथनाट्य अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही अनोख्या समारंभात न्यायिक अधिकारी, शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी, महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, जेष्ठ नागरिक आदींचे सहकार्य लाभले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी भरीव योगदान दिलेल्या शाळा, महाविद्यालय तसेच एन.सी.सी.,एन. एस. एस.,स्काउट गाईडस आणि शहर वाहतूक शाखा दक्षिण-उत्तर सोलापूर, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर, आणि न्यायिक अधिकारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष शब्बीर अहमद औटी, जिल्हा न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे, जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आली.
वाहतूक नियमांच्या जनजागृती महारॅलीचे उद्घाटन औटी यांनी केले. या रॅलीमध्ये सिध्देश्वर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे पथनाट्य आकर्षण ठरले. पथनाट्यामध्ये विद्यार्थ्यांनी कला सादर करुन वाहतुकीबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली. रॅलीमध्ये सोलापूर बारचे विधीज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे पॅनल, न्यायालयीन कर्मचारी, मल्लिकार्जुन प्रशाला, एस. व्ही.सी.एस. विधीज्ञ हायस्कूल, श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला, जिजामाता प्रशाला, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला, वालचंद महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय, संगमेश्वर महाविद्यालय, निर्मलाताई ठोकळ प्रशाला, एन.सी. सी., एन.एस.एस., स्कॉउट तसेच शहर वाहतूक शाखा उत्तर-दक्षिण सोलापूर, उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय सामील झाले होते. कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक मल्लिनाथ शहाबादे, दीपक मायभाटे, सचिन वडतिले, बाजीराव जाधवर, विजय माळवदकर, काजल चव्हाण, शेख यांनी मेहनत घेतली.