Ticker

6/recent/ticker-posts

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी घेतला निवडणूकविषयक कामांचा आढावा आधारकार्ड मतदानकार्डाशी जोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या दिल्या सूचना


सोलापूर : दि.२० (प्रतिनिधी)  मतदान कार्डाच्या नावात बदल…पुरूषाचा फोटो अन महिलेचे कार्ड…एकच फोटो असलेले अनेक मतदार असे राज्यातील काही जिल्ह्यात सर्रास घडत आहे. याकडे सर्व जिल्हाधिकारी यांनी गांर्भियाने घ्यावे. सध्या सुरू असलेली आधारकार्ड मतदानकार्डाशी जोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केल्या.

संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम, मतदारयादी दुरूस्ती आणि वाटप, आधारकार्ड लिंक याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठकीत देशपांडे बोलत होते. बैठकीला सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, मंगळवेढा प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, माळशिरसच्या ज्योती कदम, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमीत शिंदे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तहसीलदार अमोल कुंभार आदी उपस्थित होते.

देशपांडे यांनी आज पुणे, नाशिक आणि अमरावती विभागाचा आढावा घेतला. यामध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, ईव्हीएम-व्हीव्हीपॅट गोडावूनच्या बांधकामाची सद्यस्थिती, संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची पूर्वतयारीबाबत नियोजन, मतदान कार्डावर एकसारखे फोटो असलेले रद्द करणे, मतदार यादीत छायाचित्र नसलेले मतदार, प्रलंबित दावे व हरकती, मतदार यादीतील तांत्रिक चुका, मतदान कार्डाचे वाटप, आधारकार्ड मतदानकार्डाशी जोडणे आणि स्वीपद्वारे जनजागृती करणे याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. याबाबत सप्टेंबर अखेर सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सोलापूर जिल्ह्यात दुबार मतदान कार्डाची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांची माहिती डेटा सर्व्हरवर टाकण्यात येणार आहे. क्षेत्र भेटीची कामेही पूर्ण झाली आहेत. मतदानकार्ड वाटपाचे 98 टक्के काम झाले आहे, राहिलेले नवीन मतदार यांचे कार्डाचे वाटप येत्या आठवडाभरात केले जाणार आहे. आधारकार्ड जोडणीसाठी शहरी भागात अडचणी येत असून प्रतिसाद कमी येत आहे. शिवाय कामगार सकाळी लवकर कामाला जातात अन उशिरा कामावरून येत असल्याने नोंदणीचे काम प्रलंबित आहे. रेशन दुकानदार आणि आशा स्वयंसेविका यांची मदत घेऊन 30 ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याची ग्वावी शंभरकर यांनी दिली.

जिल्ह्यात 35 लाख 63 हजार 550 मतदार असून यापैकी 10 लाख 57 हजार 651 मतदारांनी मतदानकार्ड आधारकार्डशी जोडून घेतले आहे. उर्वरित नागरिकांचे आधारकार्ड जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांनी आधारकार्ड मतदानकार्डाशी त्वरित जोडून घेण्याचे आवाहनही शंभरकर यांनी केले.