Ticker

6/recent/ticker-posts

ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा प्राचार्य बापूराव पवार


कडेगांव : दि.१८  (प्रतिनिधी) ओझोन थर हा ऑक्सिजन इतकाच महत्त्वाचा असून ओझोन थरामुळेच पृथ्वीचे रक्षण होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः ओझोनची माहिती घेऊन ओझोनच्या संरक्षणासाठी समाजाला जागृत केले पाहिजे  असे प्रतिपादन प्राचार्य बापूराव पवार यांनी केले.

               
ते आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथे भूगोल शास्त्र विभागामार्फत जागतिक ओझोन दिनानिमित्य आयोजित करण्यात आलेल्या भित्तीपत्रकेच्या उद् घाटन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी भूगोल विभाग प्रमुख प्रा. सौ. स्वाती चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात जागतिक ओझोन दिनाविषयी माहिती सांगितली. 
               

ओझोन थर सूर्यापासून उद्भवणार्‍या हानिकारक अल्ट्रा व्हायलेट किरणांपासून  पृथ्वीचे रक्षण करतो. सूर्यापासून निघणाऱ्या या किरणांमुळे त्वचेचे अनेक आजार उद्भवू शकतात, असे सांगून प्राचार्य बापूराव पवार पुढे म्हणाले की, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने  19 डिसेंबर 1994 रोजी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन थराच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला व त्याला  युनायटेड नेशन्स आणि इतर 45 देशांनी ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांवरील मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली, व तेव्हापासून ओझोन थरा विषयी जागृती करण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून पाळला जातो, अशी माहिती सांगून ते शेवटी म्हणाले की,  मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचा उद्देश ओझोन थर कमी होण्यास जबाबदार असलेल्या पदार्थांचे उत्पादन कमी करून ओझोन थराचे संरक्षण करणे असा आहे असेही ते शेवटी म्हणाले.
                

प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग शास्त्र प्रमुख प्रा.स्वाती चव्हाण यांनी केले.  सदर भित्तीपत्रिकेचे संकलन प्रा. डॉ. अरुणा कांबळे व स्वाती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागातील विद्यार्थ्यांनी केले. तसेच यावेळी केतन घाडगे या विद्यार्थ्यांने ओझोन थराचे संरक्षण या विषयाचे पोस्टर प्रदर्शित केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आभार प्रा. अरुणा  कांबळे यांनी मानले.