सोलापूर : दि.१४ (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात 'हर घर तिरंगा' म्हणून जल्लोषात साजरा होत आहे. शासनस्तरावर १३ ते १५ ऑगस्टदरम्यान या महोत्सवाचे विशेष आयोजन करण्यात आलं असून त्याचं नागरिकांनी भरभरुन स्वागत केलंय. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आजपासून पंचवीस वर्षांपूर्वी १४ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात नागरिकांनी घेतलेली 'शपथ' तत्कालीन पिढ्यांना प्रेरणादायी ठरली, हे मात्र निश्चित !
सोलापुरातील भुईकोट किल्ल्यावर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव १४ ऑगस्टच्या मध्यरात्री सोलापुरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर साजरा करण्यात आला होता. शासन प्रत्येक गड-किल्ल्यावर शासन शिष्टाचाराप्रमाणे शासकीय ध्वजारोहण स्वातंत्र्य दिनाच्या प्रभातकाळी करीत असते. भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सर्वत्र उल्हास आणि जल्लोषमय वातावरणात साजरा होत असताना आपल्या राज्यातील किल्ल्यांकडे राज्यातील जनतेचे पाय वळवण्यासाठी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या वतीने 'स्वरयात्रा' अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय स्वातंत्र्य पन्नाशीत प्रदार्पण करीत असल्याने, १४ ऑगस्टच्या रात्री भुईकोट किल्ला परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वरयात्रा या संगीत रजनीत कला आणि संगीत क्षेत्रातील अनेक कलावंतांनी आपल्या कलेचे सादरीकरण करताना स्वातंत्र्यानंतरचा काळ आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक घटना आणि प्रसंगावर गीत संगीताच्या माध्यमातून जणू प्रकाश ज्योत टाकला होता.
त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पार्टी युतीची ' शिवशाही' सत्तास्थानी होती. या शिवशाहीत राज्य शासनाने राज्यातील गडकिल्ल्यांची दुरावस्था थांबविण्याच्या हेतूबरोबरच आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास राज्यातील जनतेसमोर ठेवण्याच्या प्रामाणिक भावनेतून गड-किल्ल्याच्या संवर्धनाच्या दृष्टीकोनातून योजना आणली होती. त्यातच सोलापुरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी गिर्यारोहण महासंघाने आयोजित केलेल्या स्वरयात्रा या कार्यक्रमाने देश बांधवांमध्ये नवे स्फुरण भरून उपस्थितांना दिलेल्या शपथेच्या माध्यमातून त्यांच्या अंतिम कर्तव्याचीही जाणीव करून दिली होती.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तत्कालिन कामगार मंत्री साबीरभाई शेख, क्रीडा व युवक कल्याण मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, आयुक्त यांच्यासह अन्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेतील तत्कालीन नगरसेवक-नगरसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यानिमित्त सोलापुरात पार पडलेल्या कार्यक्रमाची २५ वर्षांपूर्वीची व्हिडिओ क्लिप हाती लागली आहे. या कार्यक्रमात शिवसेना नेत्या अस्मिता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं होतं तर मोहोळचे युवा सेना नेते संतोष पाटील यांनी उपस्थितांना, देशातील प्रत्येक नागरिकाला दिशादर्शी शपथ दिली होती.
संतोष पाटील यांनी स्वरयात्रा सोहळ्यात उपस्थित नागरिकांना दिलेल्या शपथेचा मजकूर पुढीलप्रमाणे होता. ' मी माझा धर्म, माझी जात, माझा प्रांत, अथवा माझा पक्ष कोणताही असला तरी जावेळी माझ्या देशासाठी प्राणार्पण करण्याची वेळ येईल, त्यावेळी मी माझा धर्म, माझी जात, माझा प्रांत अथवा माझा पक्ष हे सर्व बाजूला ठेऊन मी माझ्या देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी सिध्द राहीन. '
जयहिंद !
वंदे मातरम् चा जयघोष
यावेळी तत्कालीन कामगार मंत्री साबीरभाई शेख यांच्या आग्रहामुळे भुईकोट किल्ल्यावरील मध्यरात्रीचे ध्वजारोहण शिवसेना युवा नेते संतोष पाटील यांच्या हस्ते झाले होते, हाही जणू ऐतिहासिक क्षण असावा, त्या कार्यक्रमास संतोष पाटील यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाच्या हस्ते भुईकोट किल्ल्यावरील ध्वजारोहण झाले होते, तेही केवळ साबीरभाईं यांच्यामुळेच ! त्यावेळी दिल्या गेलेल्या शपथेला प्रत्येक नागरिकाने अंगिकारलं पाहिजे.
ती शपथ घेण्याची संधी मिळाली ती, संतोष पाटील यांच्यामुळेच ! भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात दिल्या गेलेल्या शपथेला प्रत्येक नागरिकाने अंगिकारलं पाहिजे. ' ...सर्व भेद बाजूला ठेऊन मी माझ्या देशासाठी प्राणार्पण करण्यासाठी सिध्द राहीन. ' ही प्रतिज्ञा त्या क्षणाचा 'भाईचारा' कायम राखण्यासाठी प्रत्येकानं वचनबध्द राहिलं पाहिजे.
सौजन्य- डॉ. मनोज राठोड,
(पंचकर्म व निसर्गोपचार तज्ञ)
सोलापूर.
