सोलापूर : दि.०९ (प्रतिनिधी) मनाला सुन्न करणारी घटना अक्कलकोट तालुक्यातील पितापूर या गावात घडली आहे. हरणा नदीतून मुस्लिम समाजातील मृत व्यक्तीचे प्रेत अंत्यविधी घेऊन जाताना नदी चक्क पोहोत पार केली.एका मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार करण्यासाठी अनेकांना आपला जीव मुठीत धरून दुथडी भरून वाहत असलेल्या नदीतून प्रवास करावा लागतो.मुस्लिम समाजाचे कब्रस्तान नदी पलीकडे असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम समाजाचे नागरीक अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीतून जीवघेणा प्रवास करतात. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 हरणा नदीत पाहायला मिळाली.नूरमोहम्मद शहाबअली भांडारी(वय 45 ,रा पितापूर,ता अक्कलकोट जि सोलापूर) यांची मयत रिकाम्या बॅरल वरून घेऊन नदीतून ग्रामस्थांनी घेऊन गेली.कामानिमित्त ते पुण्यात गेले होते,अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला,पण अखेरची इच्छा होती,गावात दफनविधी करायचा म्हणून त्यांचे प्रेत पितापूर या मूळ ठिकाणी आणले होते.
नदीवर पुलाची मागणी प्रलंबितच - अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथील ग्रामस्थांनी नदीवर पूल बांधा अशी मागणी तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.पण आजतागायत हरणा नदीवर पूल बांधले गेले नाही.दरवर्षी पावसाळा सुरू झाला की हरणा नदीला पूर येते.यंदादेखील हरणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे त्यामुळे नदीपलीकडे जाण्यासाठी पितापूर येथील नागरिक रिकाम्या बॅरलचा आधार घेत आहेत.
मुस्लिम कब्रस्तान नदीपलीकडे - मौजे पितापूर येथे मुस्लिम समाजाची लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे.आणि यामधील कोणीही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्यासाठी नदीपलीकडे जावे लागते.पावसाळ्यात अंतिम संस्कार करण्यास जाताना आपले प्राण पणाला लावावे लागते.ज्या व्यक्तींना पोहता येते तेच लोक नदीपलीकडे प्रेत घेऊन जातात.रिकाम्या बॅरलपासून एक छोटीशी नाव तयार करण्यात आली आहे.सर्व विधी संपन्न करून प्रेताला हार तुरे घालून नदीपर्यंत आणून सोडतात आणि रिकाम्या बॅरलवर ठेवून अंत्यसंस्कार करण्यासाठी पोहोत मुस्लिम कब्रस्तान येथे घेऊन जातात.
