Ticker

6/recent/ticker-posts

देहभक्तीपेक्षा देशभक्ती व देवभक्ती श्रेष्ठ : श्री काशी जगद्गुरू काशी जगद्गुरूंचा अमृत महोत्सव समारंभ उत्साहात संपन्न

पुणे : दि.११ (प्रतिनिधी) संसारामध्ये प्रत्येक मनुष्याला १०० वर्षे देवाने दिलेली आहेत. त्यापैकी ५० वर्षे झोपेत जातात. साडेबारा वर्षे बालपणात तर साडेबारा वर्षे वृद्धावस्थेत जातात. उरलेली 25 वर्षे संसारचक्रात निघून जातात. हे सर्व कर्तव्य पार पाडून शेवटी योगमार्गाने शरीर सोडले तर जीवन सार्थक होते. यादरम्यान देशभक्ती व देवभक्ती करणे अत्यावश्यक आहे. काही लोक देशावर प्रेम करतात. काही लोक देवावर प्रेम करतात. तर काही लोक देशभक्तीही करत नाहीत देवभक्तीही करत नाहीत तर फक्त देहभक्ती करतात. देहभक्तीपेक्षा देशभक्ती व देवभक्ती श्रेष्ठ आहे असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
                 
ओम नमः शिवाय अधिष्ठान व श्रावणमास तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती पिंपरी चिंचवड आयोजित श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत महोत्सवप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य, ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य, गुरुगंगाधर शिवाचार्य, राचलिंग शिवाचार्य आणि गुरुसिद्ध मणीकंठ शिवाचार्य उपस्थित होते.
             
याप्रसंगी श्री बृहन्मठ होटगी संस्था, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी सदस्य, हब्बू परिवार आणि समस्त सोलापूरकरांच्या वतीने सचिव शांतय्या स्वामी यांच्या हस्ते जगद्गुरूंना शाल व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
            
यावेळी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा व काशी जगद्गुरुंच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून उपस्थितांना तिरंगा ध्वज देण्यात आला. श्रावणमास अनुष्ठानकरीता कार्यालय उपलब्ध करून दिलेले खंडूशेठ चिंचवडे यांचा जगदगुरूंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समितीच्या वतीने ७५ दिवे प्रज्वलित करण्यात आले. तसेच परमपूज्य गुरुवर्य शंकरराव सर्जे (मामा) ट्रस्ट व शिष्य परिवार यांच्या वतीने ७५ मिठाईचा भोग दाखविण्यात आला.
       
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश स्वामी यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. तर आभार रोहिणी स्वामी यांनी मानले.
            
यावेळी शशिकांत रामपुरे, मल्लिकार्जुन पाटील, योगेश हब्बु, प्रकाश जम्मा, ॲड. रविंद्र दुलंगे, उत्तम पाटील, राजेंद्र गंगदे, प्रकाश आवटे, मल्लिनाथ हुक्केरी, शिवशरण बिराजदार, सिद्धेश्वर हल्लाळी आणि होटगी संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बोरामणी, दर्गनहळळी, लिंबीचिंचोळी, कुंभारी आणि होटगी येथील भक्त उपस्थित होते.
          
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश स्वामी, रोहिणी स्वामी, राजाभाऊ मैंदर्गीकर, विजय बिराजदार, मल्लप्पा बोरगाव, सोमनाथ आलमखाने, सतीश वायचळ, मल्लय्या मठ, शिवपुत्र दरुर, बाळासाहेब बावकर, विश्वनाथ बेलुरे, बसवराज हिरेमठ,  बाबुराव मैंदर्गीकर, रेवणसिद्ध वाडकर, राजेंद्र बलसुरे, राजशेखर बुरकुले, गुरुशांत रामपूरे यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतमहोत्सव प्रसंगी शांतय्या स्वामी, शशिकांत रामपुरे, मल्लिकार्जुन पाटील, सिद्धेश्वर हल्लाळी, योगेश हब्बु 

चौकट :आमच्या एकसष्ठीनिमित्त देणगी आणि भेटवस्तूरूपाने जमा झालेल्या 55 लाख रुपयांच्या रकमेतून काशीपीठातर्फे समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अमृतमहोत्सवानिमित्त आलेल्या सर्व भेटवस्तू आणि देणग्याही शिष्यवृत्ती योजनेत जमा करणार असल्याचे काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी यावेळी घोषित केले.