Ticker

6/recent/ticker-posts

अनावश्यक उपक्रम स्थगित ठेवण्याची शिक्षक संघटनांची मागणी

सोलापूर : दि.११ (प्रतिनिधी) हर घर तिरंगा उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमांसह अनेकविध कामांची लगबग सुरु आहे .मात्र विविध अशैक्षणिक कामे व नानाविध उपक्रमांची रेलचेल यामुळे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना निर्माण होणाऱ्या अडचणींचा पाढा वाचत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी हे सर्व उपक्रम तात्काळ स्थगित करावेत अशी मागणी शिक्षणाधिकारी डाॕ.किरण लोहार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली . 
         
शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अनिल कादे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी डाॕ.लोहार यांची भेट घेतली . यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये सहशालेय उपक्रम , सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी तसेच हर घर तिरंगा उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळायला उपलब्ध झाला पाहिजे ही बाब निदर्शनास आणून दिली . मात्र राज्य शासन, जिल्हा परिषद ,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, महसूल विभाग , स्थानिक ग्रामपंचायती अशा विविध पातळीवरील शासकीय आदेशामुळे शिक्षक वर्गात  अस्वस्थता निर्माण झाली असून एकाच वेळी कोणत्या भूमिका पुर्णत्वास न्याव्यात असा प्रश्न उभा राहिल्याने निर्माण झालेल्या अडचणींची माहिती दिली .
          स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची तयारी तोंडावर असूनही शिक्षण परिषद , पालक सभा , व्यवस्थापन समिती बैठक , लिडर माता संघटना गठण , बँक खाती नव्याने उघडणे , दशसूत्री कार्यक्रम उदबोधन , मतदान ओळखपत्र आधार लिंक जोडणे , सर्व उपक्रमांची माहिती आॕनलाईन भरणे असे एका पाठोपाठ एक आदेश काढण्यात आलेले असून पुढील आठ दिवसाच्या काळासाठी स्थगित करावेत अशी मागणी करण्यात आली. यावेळी डाॕ.किरण लोहार यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन शक्य  त्याबाबी स्थगित करण्याची ग्वाही दिली .
        
या शिष्टमंडळात शिक्षक समितीचे सुरेश पवार, राजन सावंत, राजन ढवण,  संतोष हुमनाबादकर , दयानंद चव्हाण , जुनी पेन्शन संघटनेचे रामराव शिंदे, अनिल कुलकर्णी , बाळासाहेब गोरे गटाचे नेते लिंबराज जाधव, शिक्षक भारतीचे दत्तात्रय कोकडे, शिक्षक सहकार संघटनेचे रविंद्र जेटगी , तुकाराम म्हेत्रे इ. संघटना प्रतिनिधी सहभागी झाले होते . 
           
मतदान ओळखपत्र आधारलिंक करण्याची मोहीम देखील तूर्त स्थगित ठेवावी अशी मागणी उपजिल्हाधिकारी विठ्ठलराव उदमले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.