सोलापूर : बेरक्या उर्फ नारद या वेब पोर्टलच्या संपादकाविरोधात सोलापुरातील सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. पत्रकारितेचा पेशा असलेले प्रितम संजय पंडित असं फिर्यादीचं नांव असून या पत्रकाराच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ' अदखलपात्र ' सदराखाली गुन्हा नोंद करून तपास मात्र ' दखल ' घेऊन सुरू केला आहे.
शनिवारी, २२ मार्च रोजी बेरक्या नारद या वेब पोर्टलवर ०३ पत्रकारांविरोधात खंडणीची बातमी प्रसारित करण्यात आली होती. या बातमीनं सोलापुरातील पत्रकारितेच्या पटलावर खळबळ माजली होती. पत्रकारिता आणि खंडणी ची बातमी प्रसारित करीत खळबळ माजविणारा बेरक्या नारद स्वतः या अदखलपात्र गुन्ह्यात भलताच अडचणीत आल्याचं दिसतंय.
खंडणीची घटना खरी आहे किंवा कसे,हा पोलिस तपासात पुढं येईलचं, मात्र अदखलपात्र गुन्ह्याची गंभीरतेने दखल घेत कसून तपास सुरू आहे. बेरक्याला अडचणीतून बाहेर पडायचे असल्यास विश्वासाहर्ता टिकवायची तर खंडणी घेत असलेला किंवा खंडणीची रक्कम परत देतानाचा व्हिडीओ स्वतःहून प्रसारित करणे क्रमप्राप्त ठरतंय.
मराठीत ' बाप दाखव,नाही तर श्राध्द घाल' अशी एक म्हण प्रचलित आहे. 'एमडी२४न्युज' ने बेरक्याच्या संपादकाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. तद्वतच फिर्यादी प्रीतम पंडित यांचीही प्रतिक्रिया घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,उभयतांकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाली.
सबसे तेज तर्रार बातमी करण्याचा हातखंडा असलेल्या टी.व्ही. मिडीयाच्या स्थानिक पत्रकारांनी ०३.५० लाख रुपयांची खंडणी घेतली,मात्र परिस्थितीच्या चक्रव्यूहात निर्माण झालेल्या भोवऱ्यातून स्वतःच्या बचावासाठी ती रक्कम नाक घासून परत केली,या आशयाची बातमी बेरक्या नारद या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली होती.
या बातमीनं सर्वत्र संशयाचे वादळ निर्माण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी, २३ मार्च रोजी आणखी एक बातमी 'सोलापुराचे हे आहेत तीन खंडणीखोर पत्रकार" या शीर्षकाखाली बातमी जनमाणसांत आली होती. यामुळे सोलापूरच्या माध्यम क्षेत्रात मोठी रंगतदार चर्चा झाली होती. बेरक्या नारद ने ती बातमी प्रसारित करताच अवघ्या काही तासांच्या आत बातमीत मोठा बदल करून जणू स्वतः रणमैदानातून पळ काढल्यागत माघार घेतली होती.
रणछोडदास बेरक्याने खंडणीच्या मुद्यावर घुमजाव केला खरे ... ! सध्यस्थितीला पंडीतांच्या तक्रारीनंतर दाखल गुन्ह्याच्या तपासात हयगय झाली,तर त्या तपासावर 'प्रश्न ' चिन्हाचा ठसा उमठणार आहे. पोलीस तपासात खंडणीची बातमी किंवा घटना खरी असल्याचं निष्पन्न झालं तर सोन्याहून पिवळं म्हणुया ! ते वृत्त प्रसारीत करताना बेरक्या नारदने त्या बहुचर्चित खंडणीचा व्हिडीओ आहे, त्याच्याकडं असल्याचे उल्लेखिलं होतं. पोलीस तपासात तो व्हिडीओ समोर येणे अगत्याचं आहे. एकदा प्रसारीत झालेल्या बातमीत बदल पत्रकारितेच्या अलिखीत शिष्टाचाराचं चांगलं लक्षण मानलं जात नाही,तो बदल बेरक्यावर कोणाचा दबाव आला? कुणाच्या अंगुली निर्देशावरून बेरक्याने बातमीत बदल केला याचा देखील तपास करण्याचे पोलिसांसमोर एक आव्हानच आहे.
