Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर शहरात मोकाट जनावरांचा वाढला त्रास !


 भर रस्तावर ठाण मांडल्याने वाहतुकीस अडथळा !

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज !

सोलापूर : दि.०८ (प्रतिनिधी) सोलापूर शहरात मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. रस्त्यांवर एकीकडे खड्डे भरपूर झाले असून, दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध कळपाने उभी राहणारी वा रस्त्यातच ठाण मांडून बसणारी मोकाट जनावरे  यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेचे पथक काय करते असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
         

सोलापूर शहरात मोकाट जनावरे अनेक ठिकाणी भर रस्तावर ठाण मांडल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे.  वाहनचालकांचे हाल होत आहेत. यामुळे छोटे मोठे अपघात घडले आहेत. नागरिकांमधून महापालिका प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे.
    

मोकाट जनावरे पकडण्यासाठी महापालिकेचे  पथक आहे. गुरे वाहक वाहन आहे. ते पथक कुठे आणि काय कारवाई करते हाच मोठा प्रश्न आहे. अधून मधून थातूर मातुर कार्यवाही केल्याचे दाखवले जातात मात्र महापालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याचा आरोप होत आहे.
     
या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने पाळीव जनावरे रस्त्यावर सोडून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या जनावरांना ताब्यात घेण्यात यावे आणि जनावरांच्या मालकांवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे.रस्त्यात फिरणारी वा रस्त्यात ठाण मांडून बसणारी तसेच  अन्यत्र  असणारी गाय, बैल, वळू वा अन्य मोकाट जनावरे पकडून खासगी ठिकाणी सांभाळण्यास दिल्यास पालिकेचा ताण कमी होईल. अन्यथा लिलाव प्रक्रिया राबविण्यात यावी.

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत मोकाट जनावरांचे विघ्न !

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत रस्त्यावरील मोकाट जनावरे विघ्न ठरण्याची शक्यता आहे. नियोजित विविध मिरवणूक मार्गांवर आजही भर रस्त्यावर जनावरांचे कळप दिसून येत आहेत. यामुळे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त विसर्जनाच्या दिवसापूर्वी महापालिकेने करण्याची गरज आहे.

अन्यथा आता मोकाट जनावरांच्या मालकावरच कारवाई करणार !
   
पकडलेले मोकाट जनावर ७ दिवसांत घेण्यासाठी त्याचा मालक आला तर त्याच्याकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल केला जातो. या मुदतीत जनावर घेण्यास कोणीही आले नाही तर त्या जनावरांना गो शाळेत पाठविले जाते. लहान जनावरास 1 हजार तर मोठ्या जनावरास 2 हजार रुपये दंड आकारण्यात येतो मात्र दंड जमा करून मालक त्या जनावरांना घेऊन जातात आणि पुन्हा तीच जनावरे रस्त्यावर दिसून येतात. यामुळे अडचण निर्माण झाली आहे. वारंवार मोकाट जनावरे रस्त्यावर दिसून येत असल्याने अखेर महापालिकेला आता संबंधित मालकांवरच कारवाई करावी लागेल असे महापालिका मंडई विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी स्पष्ट केले.

गुरे वाहक वाहन नादुरुस्त ; फाळका तुटला!
  
सोलापूर महापालिकेकडे एकमेव असलेले गुरे वाहक वाहन फाळका तुटल्याने नादुरुस्त आहे. यामुळे वापर करता येत नाही. दुरुस्तीला एक आठवडा लागणार आहे.  श्री गणेश विसर्जनापूर्वी दुरुस्ती करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न आहे. त्यानंतर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका मंडई विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली.