सोलापूर : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वडिलांचा बनावट मृत्यू दाखला तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या इस्माईल गुलाब पठाण (वय ३६, रा.मंद्रूप,ता.दक्षिण सोलापूर) याला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज एस.शर्मा यांनी आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर हा आदेश दिला.
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही लाभार्थ्यांनी बनावट मृत्यू प्रमाणपत्रे सादर केल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत शासनाच्या निर्देशानुसार दक्षता पथकामार्फत संबंधित लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान पाच मृत्यू प्रमाणपत्रे बनावट असल्याचे संबंधित शासकीय कार्यालयांच्या अभिप्रायातून निष्पन्न झाले.
यापैकी तीन लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन लाख रुपये,अशी एकूण सहा लाख रुपयांची शासकीय रक्कम जमा झाल्याचे सुरुवातीच्या तपासात समोर आले होते. मात्र, पुढील तपासादरम्यान बनावट मृत्यू प्रमाणपत्रांच्या आधारे एकूण १२ लाख ७८ हजार रुपयांची शासकीय आर्थिक फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रकरणातील माहितीत नमूद आहे.
वडिलांचा बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा आरोप - या प्रकरणाच्या पुढील तपासादरम्यान इस्माईल गुलाब पठाण याचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पोलीस कोठडीदरम्यान झालेल्या तपासात आरोपीने आपल्या वडिलांचा बनावट मृत्यू दाखला तयार करून शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तो सादर केल्याचा आरोप आहे. तसेच हा बनावट मृत्यू दाखला तयार करण्यासाठी त्याच्या मावस बहिणी मुमताज शेख यांनी मदत केल्याचेही तपासात समोर आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९५/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९, ३३६(३), ३३७, ३४१(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथम न्यायालयात जामीन अर्ज फेटाळला; सत्र न्यायालयातून दिलासा - अटकेनंतर आरोपीतर्फे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र,न्यायालयाने हा अर्ज नामंजूर केला होता.
त्यानंतर आरोपीतर्फे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज एस.शर्मा यांनी इस्माईल गुलाब पठाण याला सदर गुन्ह्यात जामीन मंजूर केला.
आरोपीतर्फे वकिलांची फौज - या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड.अनंत मस्के,ॲड.वैभव बोंगे,ॲड. ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड. मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात,ॲड.त्वरिता वाघ,ॲड.पैगंबर सय्यद,ॲड.सलामत पटेल,ॲड.संकेत पवार आणि ॲड. प्रदीप गायकवाड यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे ॲड. कुर्डूकर यांनी बाजू मांडली.
