Ticker

6/recent/ticker-posts

मोहोळमध्ये घरात घुसून महिलेला दगडाने मारहाण; पती व मुलालाही मारहाण,कार आणि लोखंडी गेटचे नुकसान!


खाजा मुजावर याच्या बाजूने जबाब दिल्याच्या कारणावरून दोन महिलांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मोहोळ : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुंभारखानी येथे जुन्या वादातून घरात घुसून एका कुटुंबाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. खाजा मुजावर याच्या बाजूने जबाब का दिला,या कारणावरून दोन महिलांनी घरात प्रवेश करून फिर्यादीच्या पती व मुलाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी महिलेला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

मिळालेल्या पोलीस तक्रारीनुसार,ही घटना दि.16 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कुंभारखानी येथील फिर्यादीच्या राहत्या घरी घडली.

या प्रकरणात सविता राजेंद्र आंधारे (वय 55,व्यवसाय घरकाम, रा.कुंभारखानी,मोहोळ) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार कविता छबू घाडगे आणि जया छबू घाडगे उर्फ मुस्कान म.इसाक मुजावर (दोघी रा.सोलापूर) या दोघींनी फिर्यादीच्या घरात प्रवेश केला.

खाजा मुजावर याच्या बाजूने जबाब का दिला,असा जाब विचारत आरोपींनी फिर्यादीचे पती राजेंद्र आंधारे आणि मुलगा पंढरीनाथ यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी कविता हिने फिर्यादी सविता आंधारे यांना दगडाने मारहाण करून जखमी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

वाहन व घराच्या गेटचे नुकसान - मारहाणीच्या घटनेदरम्यान घराबाहेरील लोखंडी गेट तसेच फिर्यादी यांच्या होंडा सिटी कार (क्रमांक MH 04 EF 6278) वर दगड मारून नुकसान केल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.

विशेष म्हणजे,या घटनेची तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्यात आले असता तेथेही शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात आली तसेच तुमच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार देऊ, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1069/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 329(4), 324(4), 352, 351(2), 351(3) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याची नोंद दाखल अंमलदार एच.सी. 1852 क्षीरसागर यांनी केली असून, पुढील तपास एच.सी. 1743 चवरे करीत आहेत.

या घटनेमुळे कुंभारखानी परिसरात चर्चेला उधाण आले असून,पोलीस तपासात नेमकी काय माहिती समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.