बदनापूर न्यायालयाची कारवाई; पोलीस निरीक्षकांमार्फत नोटीस बजावण्याचे आदेश,संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी
जालना : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रकरणात बदनापूर येथील प्रथमवर्ग न्यायालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पत्रकार तथा साप्ताहिक बरस्ता तुफानचे संपादक इलियास अब्दुलमजीद खान यांनी दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने न्यायालयाने पाच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटीस जारी केली आहे. संबंधितांनी न्यायालयात प्रत्यक्ष किंवा अधिकृत वकिलामार्फत उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
बदनापूर येथील न्यायालयाचे न्यायिक दंडाधिकारी प्रथमवर्ग (पी.व्ही.शिंदे) यांच्या न्यायालयात Cri.M.A.No. 123/2026 या क्रमांकाने हे प्रकरण दाखल आहे.
या प्रकरणात अर्जदार म्हणून इलियास अब्दुलमजीद खान (वय ५१) यांचा उल्लेख आहे. ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून साप्ताहिक बरस्ता तुफानचे संपादक तसेच जनरल सेक्रेटरी प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र असल्याचे न्यायालयीन नोटिशीत नमूद आहे.
अर्जदारांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २५७, १९८, २०१, २२७, २२८, २२९, ३५६, ३५६(२), ६१ व ३(५) अन्वये न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
नोटीस बजावण्यात आलेले पाच अधिकारी कोण?
न्यायालयीन नोटिशीत खालील पाच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे नमूद आहेत.
1) गणेश वसंतराव मुळे (वय ५५ वर्षे) – संचालक, माहिती नागपूर अमरावती विभाग तसेच सदस्य सचिव, राज्य अधिस्वीकृती समिती बैठक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर.
2) वर्षा संतोष फडके (वय ४७ वर्षे) – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
3) नंदिनी शिवराज घाडगे (वय ४५ वर्षे) – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
4) मिलिंद मधुकर दुसाने (वय ५२ वर्षे) – जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.
5) अरुण पंडितराव सूर्यवंशी (वय ४८ वर्षे) – जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, जालना.
२० नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश - न्यायालयाने जारी केलेल्या नोटिशीनुसार,संबंधित पाचही जणांना दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयासमोर व्यक्तिशः किंवा अधिकृत वकिलामार्फत उपस्थित राहून अर्जदाराचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.
ही नोटीस पोलीस निरीक्षक,पोलीस ठाणे बदनापूर यांच्यामार्फत बजावण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद आहे.
पुढील सुनावणीकडे लक्ष - माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना न्यायालयाकडून नोटीस जारी झाल्याने या प्रकरणाकडे आता प्रसारमाध्यमांचे आणि संबंधित विभागाचे लक्ष लागले आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत संबंधित अधिकारी काय भूमिका मांडतात आणि न्यायालयात पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
