सोलापूर : कार्तिकी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पर्यंत पंढरपूर शहरात धडक तपासणी मोहीम राबविली.
या मोहिमेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील हॉटेल्स, मिठाई दुकाने, फरसाण केंद्रे, खानावळी, प्रसाद विक्रेते अशा ५४ आस्थापनांची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध खाद्यपदार्थांचे २० नमुने ज्यामध्ये भगर,बटाटा चिवडा,राजगिरा लाडू,चिक्की, बेसन,प्रसादाचे अन्नपदार्थ इ.विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.
०४ आस्थापनांचे नोंदणी परवाने निलंबित
कार्तिकी वारीच्या अनुषंगे ०४ आस्थापनांचे नोंदणी परवाने निलंबित करण्यात आलेले असून त्या पेढीचे नावे खालीलप्रमाणे आहेत.
१. मे. द पॉप्यूलर रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, बेकरी अॅण्ड कोल्ड्रींक्स, स्टेशन रोड, पंढरपूर, जि. सोलापूर
२. मे. बेंगलोर अय्यंगार बेकरी, शिवाजी चौक, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
३. मे. श्री महावीर प्युअर व्हेज, कोर्टी रोड, इसबावी, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
४. मे. स्वागत एंटरप्रायजेस, शॉपिंग सेंटर १, कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर, जि. सोलापूर
कार्तिकी यात्रा निमित्त अन्न सुरक्षा जनजागृती बैठक
कार्तिकी यात्राच्या निमित्ताने पंढरपूर येथे येणाऱ्या वारकरी, भाविक व यात्रेकरूंच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नसुरक्षेबाबत आवश्यक खबरदारी घेण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी व संबंधित घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपवासासाठी वापरण्यात येणाऱ्या भगर व इतर उपवासाच्या खाद्यपदार्थांची सुरक्षितता, त्यांची योग्य साठवणूक, हाताळणी व स्वच्छ पद्धतीने तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यात्रेदरम्यान अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना टाळण्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी वापरणे, शिळे अथवा दूषित अन्नपदार्थांची विक्री न करणे, खाद्यपदार्थ झाकून ठेवणे,अन्न तयार करणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तिक स्वच्छता राखणे तसेच विक्री व साठवणूक परिसर स्वच्छ ठेवणे याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच भगर व इतर उपवासाच्या पदार्थांची खरेदी करताना दर्जेदार व प्रमाणित स्रोतांकडूनच खरेदी करावी,उत्पादनाची मुदत, पॅकिंग व लेबलिंग तपासावे आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ व त्याअंतर्गत नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच सर्व घाऊक व किरकोळ विक्रेत्यांनी यात्रेदरम्यान भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यात यावे असे आवाहन करण्यात आले.
वारी काळात विशेष दक्षता - आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात देशभरातून लाखो वारकरी दाखल होत असतात. या काळात भेसळयुक्त,निकृष्ट दर्जाचे किंवा उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये,यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. अन्नपदार्थ साठवणूक,स्वच्छता,वापरले जाणारे तेल,रंग व इतर घटकांची गुणवत्ता याबाबत काटेकोर तपासणी करण्यात आली.
निकृष्ट आढळल्यास कारवाई - नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास संबंधित आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सर्व व्यावसायिकांनी स्वच्छता,गुणवत्ता व नियमांचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.
तसेच कार्तिकी वारी २०२६ साठी प्रशासनाचे २० पथके कार्यरत आहेत. वारी कालावधीत अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा,असेही प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
