Ticker

6/recent/ticker-posts

गोकुळसाठी अध्यादेश काढण्याची तत्परता; मग नगरपरिषदांच्या पारदर्शकतेसाठी तीन वर्षांची प्रतीक्षा का?


नगरपरिषदांच्या सभांच्या इतिवृत्तात ‘संक्षिप्त’ऐवजी ‘संपूर्ण’ शब्द समाविष्ट करण्याचा प्रस्ताव २०२३ पासून प्रलंबित; मनिष देशपांडे यांचा शासनाला सवाल

बार्शी : राज्य शासनाच्या निर्णयप्रक्रियेतील तत्परता आणि सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवरील विलंब यावरून आता नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ संदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने अवघ्या काही दिवसांत अध्यादेश काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र,नगरपरिषदांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आवश्यक असलेली नियमदुरुस्ती गेल्या तीन वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित का आहे,असा परखड सवाल संविधान प्रचारक तथा जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाचे समन्वयक मनिष रविंद्र देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.





कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अवघ्या काही दिवसांत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी ६ नोव्हेंबर २०२६ रोजी संबंधित अध्यादेशावर स्वाक्षरी केली. त्यामुळे शासनाला एखाद्या विषयावर तातडीने निर्णय घेणे शक्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

मात्र, दुसरीकडे नगरपरिषदांच्या सभांच्या इतिवृत्तामध्ये 'संक्षिप्त' या शब्दाऐवजी 'संपूर्ण' हा शब्द समाविष्ट करण्यासंदर्भातील नियमदुरुस्तीचा प्रस्ताव सन २०२३ पासून शासनाकडे प्रलंबित असल्याचे देशपांडे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

नगरपरिषदांच्या सभांमध्ये नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. शहरातील विकासकामे, निधीचे नियोजन, नागरी सुविधा, विविध प्रस्ताव आणि लोकहिताचे विषय यावर चर्चा होऊन निर्णय घेतले जातात. अशा सभांच्या इतिवृत्तामध्ये केवळ संक्षिप्त नोंदी न राहता संपूर्ण तपशील उपलब्ध झाल्यास नागरिकांना नगरपरिषदांच्या कामकाजाची अधिक स्पष्ट माहिती मिळू शकते. यामुळे प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर नागरिकांना लक्ष ठेवणे अधिक सोपे होईल, अशी भूमिका या मागणीमागे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





गोकुळच्या विषयावर तातडी, मग नागरिकांच्या हक्काच्या पारदर्शकतेवर विलंब का?

गोकुळच्या संदर्भातील कायद्यातील बदलासाठी शासनाने दाखविलेली तत्परता पाहता नगरपरिषदांच्या कामकाजात पारदर्शकता आणणाऱ्या नियमदुरुस्तीबाबतही अशीच कार्यक्षमता दाखवावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे. सार्वजनिक हिताशी संबंधित विषय तीन-तीन वर्षे प्रलंबित राहणे योग्य आहे का? शासनाच्या निर्णयप्रक्रियेत नागरिकांच्या प्रश्नांनाही तितकेच महत्त्व मिळणार की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपरिषदांच्या सभांच्या इतिवृत्तातील 'संक्षिप्त'ऐवजी 'संपूर्ण' शब्द समाविष्ट करण्यासंदर्भातील प्रलंबित प्रस्तावावर सात दिवसांच्या आत निर्णय घेऊन शासन अधिसूचना जारी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शासनाच्या निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता आणि तत्परता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एखाद्या विशिष्ट संस्थेच्या विषयावर काही दिवसांत अध्यादेश निघू शकतो, तर सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीच्या आणि पारदर्शक प्रशासनाच्या प्रश्नावर तीन वर्षे का लागावीत? हा प्रश्न आता शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे मत मनिष रविंद्र देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

एकूणच,नगरपरिषदांच्या कामकाजातील पारदर्शकतेसाठी सुरू असलेली ही मागणी आता शासनाच्या निर्णयक्षमतेची कसोटी ठरणार आहे. शासन या प्रस्तावावर सात दिवसांत सकारात्मक निर्णय घेऊन अधिसूचना जारी करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
- संविधान प्रचारक मनिष रविंद्र देशपांडे.