कर्तव्यनिष्ठा,प्रसंगावधान आणि सतर्कतेमुळे संभाव्य रेल्वे अपघात टळले; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान
मुंबई : रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेचे सुरक्षित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी प्रसंगावधान दाखवत कर्तव्य बजावणाऱ्या मध्य रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते ‘संरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
रेल्वेच्या कामकाजादरम्यान संभाव्य अपघात ओळखून वेळीच योग्य निर्णय घेणे,धोकादायक परिस्थितीची तातडीने माहिती संबंधित विभागाला देणे आणि प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी दाखवलेले धाडस अशा उल्लेखनीय कामगिरीची दखल या पुरस्कारांच्या माध्यमातून घेण्यात आली.
या दहा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विविध ठिकाणी संभाव्य रेल्वे दुर्घटना टळल्या असून,प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच रेल्वेच्या मालमत्तेचे आणि वाहतुकीचे संरक्षण होण्यास मदत झाली आहे. प्रत्येक पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्तीपत्र, उत्कृष्ट सुरक्षा कार्याचे प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
मुंबई विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा गौरव
१) प्रवीण जे.महाजन-यार्ड मॅनेजर,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस :
दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी कर्तव्यावर असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १७ वर उभ्या असलेल्या गाडी क्रमांक १२२६२ च्या पॅन्ट्री कारच्या छतामधून धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.
२) देवमणी शुक्ला-खलाशी,कॅरेज अँड वॅगन,कल्याण :
दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी रेल्वे वॅगनच्या रोलिंग-इन आणि रोलिंग-आउट तपासणीदरम्यान एका वॅगनच्या चाकाच्या पृष्ठभागावर धातूचा अतिरिक्त थर साचल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने संबंधित विभागाला माहिती दिली. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यात मदत झाली.
३) भूषण बी. पाटील-फिटर,कॅरेज अँड वॅगन,इगतपुरी :
दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मालगाडीच्या ब्रेक पॉवर तपासणीदरम्यान एका वॅगनच्या बेअरिंग कपमध्ये तुटलेला भाग असल्याचे त्यांनी ओळखले. त्यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. त्यांच्या दक्षतेमुळे संभाव्य अपघात टळला.
पुणे विभागातील दोन कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी
४) व्यंकटेश एस. भुजबळ-वाल्हा (काटेवाला) :
दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनी एका मालगाडीला सिग्नल दाखवित असताना ब्रेक व्हॅनपासून दुसऱ्या वॅगनचा पिस्टन रॉड खाली लटकत असल्याचे आणि त्यातून ठिणग्या उडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने डेंजर हँड सिग्नल दाखवून मालगाडी थांबवली. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
५) महेश बोटलाजे-लोको पायलट (गुड्स),घोरपडी :
दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी शंटिंगचे काम सुरू असताना हँड पॉइंट क्रमांक १२८ च्या टंग रेलचे टोक तुटलेले असल्याचे आणि पॉइंट योग्य स्थितीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने लोकोमोटिव्ह थांबवून संबंधित विभागाला माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टाळण्यात यश आले.
भुसावळ विभागातील तीन कर्मचाऱ्यांचा सन्मान
६) लोकेश-ट्रेन मॅनेजर,भुसावळ :
दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ यार्डमध्ये मालगाडीच्या प्रस्थानापूर्वी तपासणी करताना एका वॅगनवर लोड केलेल्या एचआर कॉइलची सेफ्टी स्ट्रिप सैल झाल्याचे आणि तिचे बकल उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित संबंधित विभागाला याची माहिती दिली. त्यामुळे मालवाहतुकीदरम्यान होणारी संभाव्य दुर्घटना टळली.
७) मिथुन यादव-तंत्रज्ञ,कॅरेज अँड वॅगन,भुसावळ :
दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी मालगाडीच्या रोलिंग-इन तपासणीदरम्यान एका वॅगनचा सीटीआरबी कप तुटलेला असल्याचे आणि ग्रीस सील जागेवरून सरकले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यांच्या दक्षतेमुळे संभाव्य अपघात टाळला गेला.
८) सोनल इंगळे-सहाय्यक उपनिरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, अकोला :
दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी अकोला रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत असताना गाडी क्रमांक २२१३८ मधून एक महिला प्रवासी धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करताना घसरून पडल्याचे त्यांनी पाहिले. संबंधित महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सोनल इंगळे यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत महिलेला सुरक्षित बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचवले. त्यांच्या धाडसाचे विशेष कौतुक करण्यात आले.
सोलापूर विभागातील लालू कुमार यांचा गौरव
९) लालू कुमार-तंत्रज्ञ,सोलापूर विभाग :
दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सोलापूर यार्डमधील क्रॉसओव्हर क्रमांक ११२ जवळून मालगाडी जात असताना अप आणि डाउन मार्गांवर काही असामान्य कंपने जाणवत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ परिस्थितीची तपासणी केली असता एक स्टेडी आर्म तुटलेल्या अवस्थेत आढळून आला.
रेल्वे मार्गावरील या तांत्रिक बिघाडाचे संभाव्य धोके ओळखून त्यांनी त्वरित संबंधित विभागाला माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच आवश्यक उपाययोजना करणे शक्य झाले आणि संभाव्य रेल्वे अपघात टळण्यास मदत झाली.
सोलापूर विभागातील लालू कुमार यांनी दाखवलेले हे प्रसंगावधान रेल्वेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले असून, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना महाव्यवस्थापकांच्या हस्ते संरक्षा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नागपूर विभागातील कर्मचाऱ्याने वाचवले प्रवाशाचे प्राण
१०) कुलवंत सिंग-हेड कॉन्स्टेबल,रेल्वे सुरक्षा दल,बैतुल :
दिनांक १८ जुलै २०२६ रोजी कर्तव्यावर असताना गाडी क्रमांक १५०२४ मध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एक प्रवासी घसरून पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रवासी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत अडकण्याची शक्यता होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने धाव घेत प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले.
रेल्वे सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची सतर्कता महत्त्वपूर्ण!
मध्य रेल्वेच्या दहा कर्मचाऱ्यांनी विविध प्रसंगी दाखवलेले धाडस,कर्तव्यनिष्ठा,तत्परता आणि प्रसंगावधान हे रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या पुरस्कार वितरणातून अधोरेखित झाले आहे. रेल्वेच्या सुरक्षित प्रवासासाठी केवळ आधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणा पुरेशी नसून, प्रत्येक स्तरावरील कर्मचाऱ्यांची जागरूकता आणि जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची आहे.
महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी या कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करत त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची दखल घेतली. त्यांच्या कार्यामुळे इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची प्रेरणा मिळणार आहे.
विशेष म्हणजे,या दहा पुरस्कार विजेत्यांमध्ये सोलापूर विभागातील लालू कुमार यांचा समावेश असल्याने सोलापूर रेल्वे विभागाच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाला या पुरस्कारामुळे विशेष सन्मान मिळाला आहे.
