आधुनिक रात्रकालीन रेल्वे सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास होणार अधिक आरामदायी; आयटी,स्टार्टअप आणि आर्थिक राजधानीला जोडणारी नवी रेल्वेसेवा
बंगळुरु-मुंबई : बंगळुरु आणि मुंबई या दोन महत्त्वाच्या महानगरांदरम्यान रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने वंदे भारत शयनयान जलद एक्स्प्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते या रेल्वेसेवेचा उद्घाटन समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी,एच.डी. कुमारस्वामी,रेल्वे राज्यमंत्री व्ही.सोमण्णा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितले की,बंगळुरु हे देशाचे माहिती-तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्राचे प्रमुख केंद्र असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या दोन्ही शहरांना आधुनिक वंदे भारत शयनयान रेल्वेने जोडल्यामुळे व्यापार,उद्योग,शिक्षण आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. या सेवेमुळे व्यावसायिक,उद्योजक,विद्यार्थी,व्यापारी तसेच पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे.
सोलापूर,पुणेकरांसाठीही महत्त्वाची रेल्वेसेवा - या रेल्वेचे विशेष महत्त्व महाराष्ट्रातील प्रवाशांसाठीही आहे. बंगळुरु ते मुंबई या मार्गावर अनंतपूर,गुंतकल,रायचूर, यादगीर,कलबुर्गी,सोलापूर,पुणे आणि कल्याण या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर आणि पुणे येथील प्रवाशांनाही या आधुनिक रेल्वेसेवेचा लाभ घेता येणार आहे.
रेल्वेचे वेळापत्रक आणि सेवा
१) बंगळुरुहून रात्री ७.४५ वाजता प्रस्थान.
२) मुंबईत दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता आगमन.
३) मुंबईहून रात्री ८.१० वाजता प्रस्थान.
४) बंगळुरुमध्ये दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता आगमन.
५) दोन्ही दिशांना आठवड्यातून सहा दिवस सेवा उपलब्ध राहणार आहे.
नियमित सेवा मुंबईहून बंगळुरुकडे २ नोव्हेंबरपासून,तर बंगळुरुहून मुंबईकडे ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
एकंदरीत,बंगळुरु-मुंबई वंदे भारत शयनयान एक्स्प्रेसमुळे कर्नाटक,आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून सोलापूरच्या प्रवाशांसाठीही ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
