येड्राव फाट्याजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील येड्राव फाटा,हुलजंती परिसरात दोन मालट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात राजस्थान येथील दोन चालकांचा मृत्यू झाला. रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या पोलीस माहितीनुसार,फिर्यादी सावरमल नानालाल गुर्जर (वय २०, रा. राजस्थान) यांचे भाऊ राधेश्याम नानालाल गुर्जर (वय २९) हे मालट्रक ट्रेलर क्रमांक आर.जे. ०६ जी.सी. २२६४ घेऊन मंगळवेढा येथून हुलजंतीच्या दिशेने जात होते. दरम्यान,येड्राव फाट्याजवळ समोरून येणारा कंटेनर मालट्रक क्रमांक एन.एल. ०१ ए.जे. ५६१६ याची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली.
कंटेनर चालक मालिका सुखराज पाल (रा. उत्तर प्रदेश) याने वाहन हयगयीने व बेदरकारपणे,रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या भीषण धडकेत मालट्रक चालक राधेश्याम गुर्जर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तसेच कंटेनर चालक मालिका सुखराज पाल याचाही अपघातात मृत्यू झाला आहे.
या अपघातात दोन्ही मालवाहू वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९८४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सावरमल नानालाल गुर्जर यांनी फिर्याद दिली असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पिसे करीत आहेत.
पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामुळे मंगळवेढा परिसरात हळहळ व्यक्त होत असून,रस्त्यावरील अतिवेग आणि निष्काळजी वाहनचालना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
