सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मोहोळ येथील मांडवे वस्ती परिसरात सुगंधित तंबाखूचा साठा केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत विनालेबल सुगंधित तंबाखू आणि ३३२० गुडकू सुगंधित तंबाखू असा एकूण ४ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्ह्याच्या नोंदीत नमूद आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकर प्रभू मांडवे, रा. मांडवे वस्ती, मोहोळ, जि. सोलापूर, यांनी दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मांडवे वस्ती येथे विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा केल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या कारवाईत विनालेबल सुगंधित तंबाखूची पाच पोती आढळून आली. प्रत्येक पोत्यात १२० पाकिटे असून एकूण ६०० पाकिटांची किंमत २ लाख ४० हजार रुपये असल्याचे नमूद आहे. तसेच ३३२० गुडकू सुगंधित तंबाखूची सात पोती आढळली. प्रत्येक पोत्यात ८० पाकिटे असून एकूण ५६० पाकिटांची किंमत २ लाख २४ हजार रुपये आहे. अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या तंबाखूची एकूण १,१६० पाकिटे आणि १२ पोती असा ४ लाख ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन,मुंबई यांनी दिनांक १३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित मावा, सुगंधित तंबाखू व तत्सम अन्नपदार्थांचा विक्रीसाठी साठा केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे.
या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेची कलमे २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ मधील कलम ५९, २६(२)(i), २६(२)(ii), २६(२)(iv), सहवाचन कलम २७(३)(e) आणि ३०(२)(a) प्रमाणे दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अशोक यमनप्पा इलागेर, वय ४६ वर्षे,अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ/२७२ माने यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता पुढील तपासात स्पष्ट होणार आहे.
