सोलापुरात डेंग्यू,मलेरिया,चिकनगुनियाचा वाढता धोका!
सोलापूर : शहरात डेंग्यू,मलेरिया आणि चिकनगुनिया या आजारांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, प्रादुर्भावग्रस्त भागांत औषध व धूर फवारणी करावी आणि स्वच्छतेच्या कामांना गती द्यावी, अशी ठाम मागणी नगरसेवक प्रशांत पल्ली आणि स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डेंग्यूच्या रुग्णसंख्येबाबत नमूद करण्यात आलेल्या आकडेवारीमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचा प्रश्न उपस्थित झाला असून,प्रशासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजना न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे सुमारे ८९० रुग्ण आढळल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. याशिवाय डेंग्यूचे १०० पॉझिटिव्ह रुग्ण,मलेरियाचे ३ आणि चिकनगुनियाचे २० रुग्ण आढळल्याची आकडेवारीही देण्यात आली आहे. ही माहिती विविध रुग्णालयांकडून मिळालेल्या आकडेवारीवर आधारित असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या आकडेवारीची अधिकृत पडताळणी करून शहरातील प्रत्यक्ष परिस्थिती स्पष्ट करावी,अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
शहरातील अनेक भागांत साचलेले पाणी,उघड्या गटारी आणि अस्वच्छ परिसर यांमुळे डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. केवळ तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्याऐवजी संभाव्य प्रादुर्भावग्रस्त भागांची आधीच पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात,अशी मागणी करण्यात आली आहे.
औषध फवारणीपासून घरोघरी सर्वेक्षणापर्यंत ठोस कृतीची मागणी!
डेंग्यू,मलेरिया आणि चिकनगुनियाचा फैलाव रोखण्यासाठी शहरातील साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावणे, गटारींची स्वच्छता करणे, आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणी व धूर फवारणी करणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने स्वतंत्र नियोजन करून संबंधित विभागांना जबाबदारी निश्चित करून द्यावी,अशी मागणी नगरसेवक प्रशांत पल्ली यांनी केली आहे.
तसेच आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करून नागरिकांना डासांमुळे पसरणाऱ्या आजारांबाबत माहिती द्यावी. ज्या भागांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे,तेथे विशेष आरोग्य पथके तैनात करावीत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियमित तपासणी करून त्याचा आढावा घ्यावा,अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य द्या!
पावसाळ्यानंतरही डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका प्रशासनाने वेळ न दवडता प्रभावी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. नागरिकांना आजारांचा सामना करावा लागू नये,यासाठी स्वच्छता,औषध फवारणी,आरोग्य तपासणी आणि जनजागृती या सर्व बाबींवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
डेंग्यू,मलेरिया आणि चिकनगुनियाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने नियोजनबद्ध कार्यवाही करावी आणि नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे आवाहन नगरसेवक प्रशांत पल्ली यांनी केले आहे.
यावेळी स्थापत्य समिती सभापती विजय चिप्पा आदी उपस्थित होते.
