खोटी कागदपत्रे तयार करण्यात माजी आमदार पिता-पुत्राबरोबर तत्कालीन तहसीलदार,मंडल अधिकारी आणि तलाठ्याचाही सहभाग ?
सांगोला : वयोवृद्ध आणि अपत्य नसलेल्या दाम्पत्याच्या मालकीच्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील नोंदीवरून वाद निर्माण झाला आहे. जवळा येथील दिलीप रावसाहेब ऊर्फ रावसो साळुंखे-पाटील यांनी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील आणि त्यांचे पुत्र सूर्यादित्य यांच्यासह काही महसूल अधिकाऱ्यांवर जमिनीच्या नोंदीत कथित गैरप्रकार केल्याचा गंभीर आरोप सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
77 वर्षीय दिलीप साळुंखे-पाटील,आणि पत्नी बबूताई वयाच्या शहात्तरीत आहेत. या दाम्पत्याला अपत्य नाही, वृद्धापकाळात त्यांना परस्परांचाच आधार आहे. अशा परिस्थितीत आपल्या मालकीच्या जमिनीवरून वाद निर्माण झाल्याने न्यायासाठी धावपळ करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील श्रमिक पत्रकार संघाच्या कक्षात, झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीप साळुंखे-पाटील यांनी त्यांच्या व्यथेला वाट मोकळी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सांगोला तालुक्यातील जवळा येथील गट क्रमांक 625 मधील 08 हेक्टर 27 आर जमीन त्यांच्या मालकीची होती. वयोमानामुळे शेतीची वहिवाट करणे शक्य नसल्याने त्यांनी 2023-24 मध्ये ही जमीन 02 वर्षांसाठी दीपक साळुंखे-पाटील यांना बटईने दिली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी जमीन बटईने देणे बंद केले.
त्यानंतर 31 जुलै 2026 रोजी जमिनीपैकी 04हेक्टर 13.50 आर क्षेत्र अशोक गणपतराव गायकवाड यांना विक्री केले, तर उर्वरित क्षेत्र पत्नी बबूताई यांच्या नावे बक्षीसपत्राद्वारे दिले. या व्यवहारांच्या नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज केल्यानंतर सात-बारा उताऱ्यावर सूर्यादित्य साळुंखे-पाटील यांचे नाव नोंदविल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. या नोंदीसाठी, 15 एप्रिल 2024 रोजी कथित बनावट आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप दिलीप साळुंखे-पाटील यांनी केला.
तत्कालीन तहसीलदार,मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यासह संबंधित व्यक्तींनी संगनमत करून खोटी कागदपत्रे तयार केली,असा त्यांचा दावा आहे. तसेच,कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधित नोंद करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी उभयतांनी पत्रकार परिषदेत केली.
या प्रकरणी सांगोला पोलिस ठाणे आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांकडे,01 सप्टेंबर, 2026 रोजी लेखी तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगोला येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात क्रिमिनल केस क्रमांक 271/2026 दाखल केली आहे. सात-बारा नोंदींविरोधात मंगळवेढा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आरटीएस अपीलही दाखल केले आहे.
याशिवाय, पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयात रे. मु. नं. 69/2026 अंतर्गत दावा दाखल केला असून,जमिनीबाबत 'जैसे थे' परिस्थिती कायम ठेवण्याचा आदेश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित जमिनीबाबत श्री नारायण देवस्थान ट्रस्टच्या नावानेही दस्तऐवज तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही पती-पत्नी वृद्ध असून, आपल्याला जीवितास धोका असल्याची भीतीही साळुंखे पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कागदपत्रांची सत्यता तपासावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेस बबूताई पाटील,अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.
