सोलापूर : शहरात डीके अशी जनमाणसात ओळख असलेल्या दशरथ कसबे यांच्या वाढदिवसाला गुन्ह्याचं गालबोट लागलं असताना जल्लोषात पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेवक राजकुमार कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. दशरथ कसबेविरूध्द गुन्हा दाखल कारण होतं, 21 हजार रूपयांचं !
आमदार विजयकुमार देशमुख यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या दशरथ कसबे यांचा 10 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. तो साजरा करण्याची तयारी अगोदरपासूनच सुरु होती. शहरातील काही भागात शुभेच्छांचे मोठे डिजीटल लावून, त्यांच्या समर्थकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांना बॉस मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी अवजड पुष्पहार जेसीबीच्या मदतीनं घालून अभिष्टचिंतन केलं.
या अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार देशमुख, नगरसेविका श्रीदेवी फुले यांच्यासह अनेकांची आवर्जून उपस्थिती होती. हा जल्लोषाचा सोहळा पार पडण्यापूर्वीच, 05 ऑक्टोबरला
वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यासाठी 21 हजार रुपयांची मागणी करून धमकी दिल्याप्रकरणी दशरथ कसबे उर्फ ‘डीके’ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तरीही आमदार देशमुख यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लाऊन कार्यकर्त्यांवरील प्रेम प्रदर्शित केल्याचं मानलं जात आहे.
याप्रकरणी विजय उर्फ पम्या तुकाराम चंदनशिवे यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात - दिलेली फिर्याद, गुन्हा दाखल होण्याचं कारण होतं. फिर्यादीनुसार, 05 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास चंदनशिवे पत्नीसाठी औषध आणण्यासाठी जात होते. त्यावेळी अंबिका चौकात दशरथ कसबे याने त्यांना अडवून, ‘यावर्षी माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे. त्यासाठी 21 हजार रुपये द्यावेच लागतील,’ अशी मागणी केल्याचं फिर्यादीत उल्लेखिलं आहे.
तसेच, ‘निवडणुकीत माझ्याविरुद्ध काम केलेस, आता माझ्या गल्लीत राहण्यास आलास. मी सांगतो तेवढे पैसे पोहोच कर, अन्यथा मी कोण आहे, ते दाखवून देतो,’ अशी धमकी देत शिवीगाळ करताना चापट मारून ‘तुला खल्लास करीन, नाहीतर खोट्या गुन्ह्यात अडकवीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फौजदार घोडके पुढील तपास करीत आहेत.
