Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी; पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक


जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर; “पत्रकारांवरील खोटे गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत” - यशवंत पवार

सोलापूर : पुणे येथे राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांचा आवाज निर्भीडपणे मांडल्याप्रकरणी एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर COEP प्रशासनाने दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा,या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजातील वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त घटकांच्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठविण्याचे माध्यम आहे. राज्यातील अनेक पत्रकार प्रामाणिकपणे काम करत असून,प्रशासनासमोर नागरिकांच्या समस्या मांडण्याचे काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून करीत आहेत. अशा पत्रकारांवर आकसापोटी किंवा बातमीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करणे ही बाब चिंताजनक असल्याचे पत्रकार सुरक्षा समितीने निवेदनात म्हटले आहे.


“बातमी केल्यावर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी?”
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “पत्रकारिता हा वसा,ध्यास आणि चळवळ आहे. समाजातील वंचित घटकांच्या न्याय-हक्कासाठी पत्रकार निर्भीडपणे काम करतात. लोकांचे प्रश्न,समस्या,अडचणी आणि वैचारिक भूमिका मांडणाऱ्या पत्रकारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी मांडलेल्या बातम्यांवरूनच त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतील,तर पत्रकारिता करायची कशी?”



पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि त्यांच्या सुरक्षिततेचे संरक्षण झाले पाहिजे. पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे किंवा अन्यायकारक गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही यशवंत पवार यांनी यावेळी दिला.





पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची योग्य चौकशी करून तो मागे घेण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी,अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी,सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू,समन्वयक लक्ष्मण सुरवसे,सचिव रमेश दागारी,संघटक गणेश निंबाळकर,विष्णू सकट,संदीप धोत्रे,श्याम वायदंडे,वैभव जाधव,बसवराज हमाले,रितेश रणसुभे यांच्यासह पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.