Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात ‘ड्रग फ्री कॅम्पस’ अभियानाला वेग


शाळा-महाविद्यालय परिसरात अमली पदार्थांची विक्री व सेवन रोखण्यासाठी जनजागृती; पोलिस अधिकारी,शिक्षक व प्राचार्यांचा सहभाग

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात अवैध अमली पदार्थांच्या वापराचे वाढते प्रमाण आणि त्यातून निर्माण होणारे गंभीर धोके लक्षात घेऊन अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने ‘महाराष्ट्र अमली पदार्थ मुक्त अभियान’ तसेच ‘शून्य सहनशीलता (Zero Tolerance)’ धोरणांतर्गत ‘ड्रग फ्री कॅम्पस’ हा उपक्रम राबविण्यात आला.
पोलिस आयुक्त एम.राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलिस उपआयुक्त वृष्टी जैन,पोलिस उपआयुक्त (गुन्हे/विशेष शाखा) डॉ.अश्विनी पाटील,पोलिस उपआयुक्त (परिमंडळ) प्रितम यावलकर तसेच सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


नियोजन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक म.सु.वि. कक्ष आफिसर राजा शेख,पोलिस निरीक्षक एएचटीयू स्नेहा म्हेत्रे,सहायक पोलिस निरीक्षक स्वाती येळे यांच्यासह महिला कक्षातील पोलिस अंमलदार सहभागी झाले.

विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न
सोलापूर शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांचे सेवन,विक्री व प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर कार्यक्रमात भर देण्यात आला. विद्यार्थ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सकारात्मक वातावरण मिळावे,यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी डॉ.अश्विनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. पोलिस आयुक्त एम.राजकुमार तसेच सोनाली काळे,उपसंचालिका मुक्तांगण एडिक्शन सेंटर,पुणे आणि रामचंद्र वाघमारे,सारथी यूथ फाउंडेशन,सोलापूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व व्याख्यानातून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती दिली.

शाळा-महाविद्यालय प्रशासनानेही पुढाकार घेण्याचे आवाहन
कार्यक्रमात डॉ.संतोष कोटी,प्राचार्य,वालचंद कला व विज्ञान महाविद्यालय,सोलापूर तसेच विठ्ठलनंद स्वामी,सचिव, सोलापूर शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास सोलापूर शहरातील शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे ४०० ते ४५० प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यामुळे अमली पदार्थांविरोधातील जनजागृतीला शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक स्वरूप देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले.

‘ड्रग फ्री कॅम्पस’साठी पोलिस यंत्रणा सक्रिय
अमली पदार्थांच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी केवळ पोलिस कारवाई पुरेशी नसून शाळा,महाविद्यालये, शिक्षक,पालक,विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचा समन्वय आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
पोलिस विभागाच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा विशेष कक्षातील अधिकारी व अंमलदारांनीही या अभियानाच्या अंमलबजावणीत सहभाग घेतला. सोलापूर शहरातील शैक्षणिक परिसर अमली पदार्थमुक्त करण्यासाठी ‘Zero Tolerance’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.