शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये; सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
सोलापूर : व्यवसायाच्या यशासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा आदर्श घालून देत सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. श्री आजोबा ताता गणपती मंडळ, क्रांती चौक,कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर, कुंभारी यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी श्री आजोबा ताता गणपती मंदिर परिसर, क्रांती चौक, कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर,खडी मशीन मागे,कुंभारी येथे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच आई किंवा वडील निधन पावलेल्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सन डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा भुमेश यनगंदुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. नवीन वह्या हातात मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरला.
यावेळी बोलताना भुमेश यनगंदुल यांनी, “शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात मोठे सामर्थ्य आहे. केवळ आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,” अशी भावना व्यक्त केली. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी समाजातील सक्षम व्यक्तींनी पुढाकार घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
हा उपक्रम केवळ वह्यांचे वाटप करण्यापुरता मर्यादित न राहता गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला आधार देणारा आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा उपक्रम ठरला. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्यास शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते,असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री आजोबा ताता गणपती मंडळाचे पदाधिकारी,सभासद आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.
सन डेव्हलपर्सच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त राबविण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम समाजातील गरजू घटकांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला असून, भविष्यातही समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
