Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन



सोलापूर : (निधन वार्ता) सोलापूरच्या राजकीय क्षेत्रातून अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)चे सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपूर्वी रियाज शेख हे दुचाकीवरून जात असताना सोलापूर शहरात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.

रियाज शेख हे अतिशय धडाडीचे आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून सोलापूरच्या राजकीय वर्तुळात परिचित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये ते सातत्याने सक्रिय राहिले. पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते म्हणूनही रियाज शेख यांची राजकीय क्षेत्रात ओळख होती. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक सक्रिय आणि झुंजार कार्यकर्ता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.



दरम्यान, रियाज शेख यांची अंत्ययात्रा रविवार, ३० ऑगस्ट रोजी मोरारजी पेठ येथील पोलीस लाईन परिसरातील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून,त्यांच्यावर मोदी मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रियाज शेख यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे.