राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोलापूर पोलिसांची ‘संडेज ऑन सायकल’ रॅली; ‘खेलेगा भारत,जितेगा भारत’चा दिला संदेश
सोलापूर : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने ‘खेलेगा भारत, जितेगा भारत’ या संकल्पनेतून सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आज ‘संडेज ऑन सायकल’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधिकारी,अंमलदार तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत निरोगी जीवनशैली,व्यायाम आणि सायकलिंगचा संदेश दिला.
या रॅलीमध्ये पोलीस आयुक्त एम.राजकुमार,पोलीस उपायुक्त वृष्टी जैन,डॉ.अश्विनी पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार आणि सहभागी नागरिक उपस्थित होते.
‘फिट इंडिया’चा संदेश जनतेपर्यंत
राष्ट्रीय क्रीडा दिन हा हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. यंदा राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपक्रमांसाठी ‘Khelega Bharat, Jeetega Bharat’ ही संकल्पना असून ‘Tribute, Play and Move’ या तीन प्रमुख स्तंभांवर विविध क्रीडा व फिटनेस उपक्रम राबविण्यात येत आहेत.
याच उपक्रमाचा भाग म्हणून ३० ऑगस्ट रोजी ‘Sundays on Cycle’च्या माध्यमातून सायकलिंग, वॉकथॉन, रन-अँड-राईड यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
पोलिसांचा सहभाग ठरला विशेष आकर्षण
सोलापूर पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांनी स्वतः सायकल रॅलीमध्ये सहभागी होत नागरिकांना दररोजच्या धावपळीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ देण्याचे आवाहन केले. सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीलाही प्रोत्साहन मिळते.
पोलीस दलाकडून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद व सहभाग वाढविणे’ तसेच समाजात फिटनेसविषयी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा संदेशही देण्यात आला.
‘खेळा, तंदुरुस्त राहा आणि देशाला जिंकवा’
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या माध्यमातून केवळ खेळाडूंनीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात काही ना काही शारीरिक व्यायामाचा समावेश करावा,हा संदेश दिला जात आहे. केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ उपक्रमाचा उद्देशही नागरिकांमध्ये फिटनेसची सवय आणि क्रीडा संस्कृती रुजविणे हा आहे.
सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी,कर्मचारी आणि नागरिक एकत्र सायकलिंग करताना दिसले,त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने सोलापुरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘खेलेगा भारत,जितेगा भारत’ आणि ‘फिट इंडिया’चा संदेश देत सोलापूर पोलिसांची ही सायकल रॅली आरोग्य,तंदुरुस्ती आणि सामाजिक सहभागाचे प्रेरणादायी उदाहरण ठरली.
