Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारांवरील ‘खंडणी’च्या गुन्ह्यांविरोधात पत्रकार सुरक्षा समिती आक्रमक


विशेष पोलीस महानिरीक्षकांची शिष्टमंडळ घेणार भेट; स्वतंत्र चौकशी करून खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी - प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार

सोलापूर : (एमडी२४न्यूज)  निर्भीड आणि पारदर्शक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर बातम्या प्रकाशित केल्याच्या कारणावरून दबाव आणण्यासाठी खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत पत्रकार सुरक्षा समितीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी समितीचे शिष्टमंडळ लवकरच विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार म्हणाले.

पत्रकारांनी अवैध व्यवसाय,भ्रष्टाचार,गैरप्रकार अथवा प्रशासनातील अनियमितता याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर काही संबंधित व्यक्तींकडून पत्रकारांवर दबाव आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा समितीने केला आहे. काही प्रकरणांमध्ये चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पोलीस यंत्रणेला देऊन पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

यशवंत पवार म्हणाले की, “पत्रकाराने निर्भीडपणे आणि पारदर्शकपणे काम करणे ही लोकशाहीची गरज आहे. मात्र, बातमी प्रसिद्ध केली म्हणून पत्रकारावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याला मानसिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असेल,तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.”



पत्रकारांवर हल्ले,धमक्या आणि मारहाणीचे प्रकार चिंताजनक - महाराष्ट्रात पत्रकारांवर हल्ले, मारहाण, धमकी तसेच बातमी प्रसिद्ध करण्यावरून दबाव आणण्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. विशेषतः वाळू माफिया,गुटखा माफिया,अवैध व्यावसायिक तसेच काही राजकीय व्यक्तींकडून पत्रकारांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे.

“बातमी प्रसिद्ध केली म्हणून पत्रकाराला धमकी,मारहाण किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होणार असेल,तर पत्रकारिता करायची कशी?” असा सवालही यशवंत पवार यांनी उपस्थित केला.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. मात्र,पत्रकारांवर सातत्याने दबाव निर्माण होत असेल आणि त्यांना संरक्षण मिळत नसेल,तर त्याचा थेट परिणाम स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारितेवर होतो,अशी भूमिका पत्रकार सुरक्षा समितीने मांडली आहे.



ग्रामीण पत्रकारांची आर्थिक परिस्थिती बेताची - ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अल्प मानधनावर काम करतात. अनेकांना पत्रकारितेतून मिळणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित असते. अशा परिस्थितीत एखाद्या पत्रकारावर खंडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यास त्याच्या प्रतिष्ठेवर,कुटुंबावर, आर्थिक परिस्थितीवर आणि पत्रकारितेच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होतो,असे समितीचे म्हणणे आहे.

समितीच्या मते,काही अवैध व्यावसायिक किंवा संबंधित व्यक्तींकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊन पत्रकारांवर दबाव निर्माण करण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल केले जात असल्यास त्याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.



सोलापूर जिल्ह्यातील प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी - सोलापूर शहरासह मोहोळ,पंढरपूर, अक्कलकोट तसेच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये पत्रकारांवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचा दावा पत्रकार सुरक्षा समितीने केला आहे.

या सर्व प्रकरणांची केवळ प्राथमिक माहितीच्या आधारे न राहता स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यामार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी,अशी प्रमुख मागणी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यात येणार आहे.

पत्रकाराने प्रत्यक्षात खंडणी मागितली आहे का,बातमीच्या बदल्यात आर्थिक मागणी केली आहे का,संबंधित तक्रारीमागील पार्श्वभूमी काय आहे, तसेच पत्रकारिता करताना प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळेच गुन्हा दाखल झाला आहे का,यासह सर्व बाबींची कायद्यानुसार निष्पक्ष तपासणी करावी,अशी मागणी समिती करणार आहे.



गुन्हे मागे न घेतल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा - पत्रकारांवर अन्यायकारक पद्धतीने गुन्हे दाखल झाले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यास असे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात येणार आहे. या प्रकरणी योग्य आणि पारदर्शक तपास करून पत्रकारांना न्याय न मिळाल्यास राज्यातील निर्भीड आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्र करून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकार सुरक्षा समितीने दिला आहे.

“पत्रकाराला कायद्यापेक्षा वरचे स्थान देण्याची आमची मागणी नाही; मात्र पत्रकाराविरुद्ध तक्रार झाली म्हणून त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यापूर्वी तक्रारीची सत्यता, उपलब्ध पुरावे आणि संपूर्ण पार्श्वभूमी यांची कायदेशीर चौकशी होणे गरजेचे आहे. पत्रकारांवर अन्याय झाला तर पत्रकार सुरक्षा समिती गप्प बसणार नाही,” असा इशारा प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिला.



शिष्टमंडळात पदाधिकाऱ्यांचा समावेश - विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादरणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा संघटक अरुण सिडगिद्दी,सोलापूर शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू,समन्वयक लक्ष्मण सुरवसे,सचिव रमेश दग्गारी,संघटक गणेश निंबाळकर,रशीद शेख,बसवराज हमाले आणि श्रीनिवास पेद्दी यांच्यासह कोल्हापुरातील स्थानिक पत्रकार ही उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी एमडी२४न्यूजशी बोलताना दिली. 

“पत्रकारांच्या लेखणीवर दबाव आणणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत उत्तर मिळाले पाहिजे; पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका पत्रकार सुरक्षा समितीने घेतली आहे.