‘बसव भारत उत्सव २०२७’ साठी सोलापुरातून एक लाख भाविकांचा सहभागाचा निर्धार
सोलापूर : बसवकल्याण क्षेत्र समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित बैठक क्रमांक ४ व सत्कार समारंभ रविवारी (दि. २ ऑगस्ट) मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे मंगल कार्यालय, हत्तुरे नगर,सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ‘बसव भारत उत्सव २०२७’ भव्य स्वरूपात यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर होते. यावेळी बसवारूढ मठाचे प.पू.शिवपुत्र महास्वामीजी, महाराष्ट्र प्रभारी डॉ.अमरनाथ सोलपुरे, प्रदेश उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे,प्रदेश सचिव प्रा.शेषराव शेटे (नांदेड), डॉ.मल्लिकार्जुन तरनल्ली आणि नागेश नागठाणे (परभणी) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बैठकीत दि. २३ ते २७ डिसेंबर २०२७ दरम्यान बसवकल्याण येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बसव भारत उत्सव २०२७’ संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या महोत्सवात १ लाख ९६ हजार शरण-शरणींचे सामूहिक इष्टलिंग पूजन, देश-विदेशातील विद्यापीठातील युवकांसाठी युवा संसद व परिसंवाद,तसेच महाराष्ट्र,कर्नाटक,तेलंगणा, आंध्र प्रदेश,केरळ,तामिळनाडू आणि परदेशातील प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली. या महोत्सवाला २५ ते ३० लाख भाविक उपस्थित राहतील,तर सोलापूर जिल्ह्यातून एक लाख नागरिकांचा सहभाग नोंदविण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आला.
बैठकीतील महत्त्वाचे ठराव
१) उत्सवाच्या प्रचार-प्रसारासाठी राज्यभर व्यापक जनजागृती मोहीम राबविणे.
२) मंगळवेढा येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या स्थळाचा आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे.
४) महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा विस्तार करून त्याला स्वायत्त दर्जा देण्याची मागणी.
५) आगामी जनगणनेत धर्माच्या रकान्यात ‘लिंगायत’ अशी स्वतंत्र नोंद व्हावी,यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रंजीता चाकोते,वैशाली भोपळे,सुमन चाबुकस्वार,राजशेखर पाटील,सातलिंग शटगार,वीरेंद्र हिंगमिरे,चंद्रकांत रमणशेट्टी,शिवानंद दुत्तरगी तसेच पीएच.डी.पदवी प्राप्त सोनाली घोंगडे यांचा सन्मान करण्यात आला.
मान्यवरांनी समाजाच्या शैक्षणिक,आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. बसव विचारांचा प्रसार, युवकांचे संघटन आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास प्रा.चारुशीला तासगावे,बिरादार,राजश्री थळगे, सिद्धाराम कोरे,गणेश चिंचोली,विजयकुमार गुत्ते,राधाकृष्ण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.राजेश विभुते यांनी केले,तर प्रा.सुनील हेंगणे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विजयकुमार हत्तुरे (प्रदेश उपाध्यक्ष), बसवराज दिंडोरे (जिल्हाध्यक्ष), चन्नप्पा गुरुभेट्टी (शहराध्यक्ष), सिद्धाराम तांबुळे (कार्याध्यक्ष), नागेश पडणूरे, श्रीशैल पॅडशिंगे, जवळगी सर, संदेश हत्तुरे, ओंकार हत्तुरे तसेच संयोजक समितीतील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
