Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग


सोलापूर : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती,मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज नियोजन भवन,सोलापूर येथे उत्साहपूर्ण शुभारंभ झाला.

कार्यक्रमाचे उदघाटन सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी बोलताना शर्मा यांनी न्यायालयात प्रलंबित असलेले वाद मध्यस्थीच्या माध्यमातून सामोपचाराने निकाली काढणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रशिक्षित मध्यस्थांची संख्या वाढल्यास पक्षकारांना जलद,सुलभ व परिणामकारक न्याय मिळण्यास मोठी मदत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



याप्रसंगी MCPC,नवी दिल्ली येथील वरिष्ठ प्रशिक्षक तथा सिटी सिव्हिल जज व प्रशासकीय न्यायाधीश,दिंडोशी (मुंबई) संजीव भालेराव,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे तसेच सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रशिक्षण कार्यशाळेत MCPC,नवी दिल्ली चे संजीव भालेराव व अमोलकुमार ए. देशपांडे हे प्रशिक्षक म्हणून ४० तास मार्गदर्शन करीत आहेत.

दिनांक ३० जुलै ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या ४० तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमात सोलापूर,अक्कलकोट व मोहोळ येथील ४९ ज्येष्ठ वकिलांनी सहभाग नोंदविला आहे. मध्यस्थी प्रक्रियेबाबत सखोल सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले,तर आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोलकुमार ए. देशपांडे यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव अमोलकुमार ए. देशपांडे यांच्या देखरेखीखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.