नवी दिल्ली : देशभरात गाजलेल्या नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा,या प्रमुख मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सीजेपी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून,विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि परीक्षापद्धतीत पारदर्शकता यावी,यासाठी आंदोलनकर्ते ठाम भूमिका घेत आहेत.
या आंदोलनाला अधिक बळ देण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलग १९ दिवस उपोषण केले. मात्र,प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असून, देशभरातील विद्यार्थी,पालक आणि शिक्षणप्रेमींकडून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे.
दरम्यान, व्वा (WOW) संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा विद्याताई लोलगे यांनी जंतर-मंतर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात देशातील युवक,पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन त्यांनी केले.
विद्याताई लोलगे यांच्या पाठिंब्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनाला आणखी बळ मिळाले असून,विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
