सोलापूर : जैन सोशल ग्रुप,सेंट्रलची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) व पदग्रहण समारंभ रविवारी (दि. ७ जून २०२६) गुजराती मित्र मंडळ,सोलापूर येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी,माजी पदाधिकारी,कार्यकारिणी सदस्य आणि सुमारे २०० सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष केतन शहा होते. व्यासपीठावर विद्यमान अध्यक्ष संजय शहा,माजी अध्यक्ष गौतम संचेती,उपाध्यक्ष संतोष रमेश बंब,सचिव अशोक छाजेड,सहसचिव संजीव पाटील आणि कोषाध्यक्ष अतुल गांधी उपस्थित होते. वातानुकूलित सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सचिव अशोक छाजेड यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच नवकार महामंत्राच्या पठनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. स्वागतपर नृत्य कु.मांडोत यांनी सादर केले.
यावेळी अध्यक्ष संजय शहा यांचा चार वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संस्थापक अध्यक्ष केतन शहा यांनी नूतन अध्यक्ष म्हणून संतोष रमेश बंब यांच्या नावाची घोषणा केली. सभासदांनी सर्वानुमते या निवडीस मंजुरी दिली. तसेच उपाध्यक्षपदी अशोक छाजेड आणि सचिवपदी पद्मकुमार मेहता यांची निवड जाहीर करण्यात आले.
नूतन अध्यक्षा संतोष बंब यांनी नव्या संचालक मंडळाची यादी वाचून दाखवली. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष केतन शहा यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांना पदग्रहण व गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
अध्यक्ष म्हणून चार वर्षे उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल माजी अध्यक्ष संजय शहा यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच त्यांना "JSG सेवा रत्न" या विशेष उपाधीने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात संजीव पाटील यांची रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच संस्थापक केतन शहा आणि नंदकिशोर शहा यांना भास्कर समूहातर्फे प्रदान करण्यात आलेल्या "भगवान महावीर करुणा पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आले.
यावेळी शहरातील विविध जैन मंदिरांचे पदाधिकारी,गुजराती मित्र मंडळाचे पदाधिकारी तसेच अन्य मान्यवर पाहुण्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आले. कोषाध्यक्ष अतुल गांधी यांनी सन २०२५-२६ चा वार्षिक आर्थिक अहवाल सादर केला. सभेने हा अहवाल सर्वानुमते मंजूर केला.
नूतन अध्यक्षा संतोष रमेश बंब यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या भावी वाटचालीचा संकल्प व्यक्त करत सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी नूतन संचालक म्हणून गौतम संचेती,हितेंद्र शहा, धन्यकुमार खाबे, दिनेश जैन,नूतन गांधी,चंद्रकांत दोशी,हितेंद्र वोरा,संजय पटवा,प्रीतेश बंब,राजीव शहा,रूपल शहा,वासंती कोठारी,जयश्री लोणावत,हेतल अवलानी,आनंदी बोथरा आणि मीना आर. शहा यांची नियुक्ती करण्यात आले. सल्लागार समितीत नंदकिशोर शहा,इंदरमल जैन,बाबू मेहता आणि प्रवीण दोशी यांची निवड करण्यात आले. तसेच सांगिनी अध्यक्षा म्हणून निशा गांधी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आले.
संजय शहा आणि केतन शहा यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष गौतम संचेती यांनी केले,तर संजीव पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. सुप्रसिद्ध गायक डॉ.मोहोळकर यांनी सादर केलेल्या जुन्या सुरेल गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आनंद, उत्साह आणि एकोप्याच्या वातावरणात या भव्य कार्यक्रमाची सांगता झाली.
