स्कॉर्पिओ गाडी व मोबाईल परत देण्यासाठी १.२० लाखांची लाच; दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात
सोलापूर : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी व मोबाईल परत देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकांना जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,आरोपींमध्ये राजेश्वर रामचंद्र कोळी (पोहे/५४७०),लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे (पोहे/६१९) हे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी असून आकाश शरणप्पा काडस्ने (वय ३३,रा.अज़ाद गल्ली, अक्कलकोट) या खासगी व्यक्तीचाही समावेश आहे.
तक्रारदाराची स्कॉर्पिओ गाडी मित्राने फिरण्यासाठी मागून घेतली होती. ही गाडी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात वापरली गेल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आली होती. यासोबतच तक्रारदाराचा लहान भाऊ व काका यांच्याकडील मोबाईल आणि स्कॉर्पिओ गाडी चार दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होती.
त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराच्या भावावर व काकावर गुन्ह्यात नाव टाकून अटक करण्याची धमकी दिली. तसेच गाडी व मोबाईल परत देण्यासाठी आणि जामीन करून देण्यासाठी सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम १ लाख २० हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरकडे तक्रार दाखल केली. एसीबीने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर १६ जून २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान खासगी इसम आकाश काडस्ने याने आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांच्या वतीने १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिघांनाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित) मधील कलम ७,७(अ) व १२ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र लांगते, पोलीस निरीक्षक शैलेश पवार तसेच एसीबी सोलापूरच्या पथकाने केली.
एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की,कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय काम करून देण्यासाठी अथवा कामात सवलत देण्यासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
