Ticker

6/recent/ticker-posts

वीरशैव-लिंगायत विकास मंडळ स्थापन करा; वीरशैव लिंगायत महासभेची केरळ सरकारकडे मागणी


तिरुवनंतपुरम : अखिल भारतीय वीरशैव-लिंगायत महासभा, तिरुवनंतपुरम जिल्हा युनिटच्या वतीने केरळ राज्याचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे शिस्त पालन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते मा. ए.के.अँटोनी तसेच केरळ राज्याचे ऊर्जामंत्री तथा केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. सन्नी जोसेफ यांची भेट घेऊन केरळ वीरशैव-लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये केरळ राज्यातील सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या वीरशैव-लिंगायत समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक व रोजगारविषयक विकासासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय ओमन चांडी यांच्या कार्यकाळात समाजाला मिळालेल्या विविध सवलती, शैक्षणिक संधी आणि प्रतिनिधित्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.





महासभेने शासनाकडे मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये 

1)पथनमथिट्टा जिल्ह्यातील अडूरजवळ एनाथ येथे स्थापन करण्यात आलेल्या वीरशैव आर्ट्स ॲड. सायन्स कॉलेजला चालू शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या देणे.                                  

2) तिरुवनंतपुरम येथे जगद्ज्योती बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण                      

3)केरळ विधानसभेत जगद्ज्योती बसवेश्वर यांचे तैलचित्र स्थापित करणे.                                                        

4)बसव जयंतीला सार्वजनिक सुट्टी घोषित करणे तसेच कर्नाटक व महाराष्ट्रच्या धर्तीवर वीरशैव-लिंगायत विकास मंडळ (VLDB) स्थापन करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविणे या मागण्यांचा समावेश आहे.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन वीरशैव-लिंगायत समाजाच्या प्रगतीसाठी केरळ शासनाने ठोस पावले उचलावीत,अशी विनंती महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी केरळ राज्य वीरशैव-लिंगायत महासभेचे अध्यक्ष टी. पी. कुंजुमोन, महाराष्ट्र लिंगायत समाजाचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे, उद्योगपती संतोष फताटे, जिल्हा सचिव आर. प्रेमकुमार, प्रदेश कंदन के,यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.