Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरात राज्यस्तरीय लिंगायत वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न


सोलापूर  : सोलापूर येथे मातोश्री सिद्धवाबाई सांस्कृतिक भवन, हत्तुरे वस्ती (विमानतळासमोर) येथे राज्यस्तरीय लिंगायत वधू-वर व पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात सुमारे २५० वधू-वर व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात शिवयोगी सिद्धरामेश्वर व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन उद्योजक शंकरराव लिंगे व जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष प्रा. शिवानंद गोगाव यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

यावेळी युवा उद्योजक सचिन शिवशक्ती,सकलेश बाभुळगावकर, बसवराज दिंडोरे (युवा जिल्हाध्यक्ष,जागतिक लिंगायत महासभा सोलापूर), सिद्धराम कटारे (अध्यक्ष, लिंगायत महामंच सोलापूर शहर), श्रीशैल पॅडसिंगे,नागेश पडनुरे, ओंकार हत्तुरे, निलेश पाटील, मोहिनी खलिपे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते वधू-वर सूचक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या मेळाव्यात लिंगायत समाजातील वाणी,माळी,कुंभार,तेली, बनजगार,गवळी,जंगम,शिलवंत,दीक्षावंत,कोष्टी,पंचम आदी विविध पोटजातींतील वधू-वर व पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उद्योजक शंकरराव लिंगे यांनी सांगितले की, विश्वगुरू बसवण्णांनी दिलेला लिंगायत धर्म वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आहे. त्यामुळे विवाह जुळविताना पत्रिका किंवा जन्मकुंडली यावर अवलंबून न राहता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा. बसवण्णांच्या काळातील अज्ञान,अंधश्रद्धा व जातीयतेच्या विरोधात त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

विजयकुमार हत्तुरे यांनी आपल्या भाषणात बसव धर्माचा प्रसार आणि विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वधू-वर मेळाव्यांची माहिती दिली. सांगली,कोल्हापूर,पुणे, बेळगाव,जत आदी भागांतील माहितीच्या आधारे सोलापूरमधील नोंदणीकृत वधू-वरांना पुढील लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमस्थळी उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मेळावा यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष आप्पासाहेब शेगावे,कार्यवाहक प्रियांका शेगावे, सुनिल दलाल,निलेश पाटील,श्रीशैल पॅडसिंगे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रियांका शेगावे यांनी आभार प्रदर्शन केले.