mahresult.nic.in, sscresult.mkcl.org वर उपलब्ध होणार निकाल; गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठीही ऑनलाईन अर्जाची सुविधा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार, दि. ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी ही माहिती दिली.
राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत यंदाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) घेण्यात आली होती. निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा अखेर उद्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे.
विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे :
www.mahresult.nic.in�
sscresult.mkcl.org�
ssc.mahresults.org.in�
तसेच www.mahahsscboard.in� या अधिकृत संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकालासह इतर आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निकालासोबत विविध सांख्यिकी माहितीही विद्यार्थ्यांना पाहता येईल.
पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत आवश्यक
निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. मंडळाच्या सूचनेनुसार पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य राहणार आहे.
उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत विद्यार्थ्यांनी आवश्यक शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक असेल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
