राज्यस्तरीय स्मशानभूमी अभ्यास समितीची पहिली बैठक; ग्रामीण भागातील सुविधांसाठी मोठे निर्णय
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील स्मशानभूमींची सद्यस्थिती, अद्ययावतीकरण आणि आवश्यक सोयीसुविधांचा सखोल अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने गठीत केलेल्या राज्यस्तरीय अभ्यास समितीची पहिली बैठक २९ एप्रिल बुधवार रोजी मंत्रालयात पार पडली. या बैठकीत स्मशानभूमींच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
सदर समिती स्थापन करण्याचा निर्णय ३१ जुलै २०२५ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. ग्रामीण भागातील स्मशानभूमींमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी दूर करणे,त्यांचे आधुनिकीकरण करणे आणि पाणी,वीज,रस्ते, छत,स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा या समितीचा मुख्य उद्देश आहे.
समितीच्या अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून,सदस्य म्हणून आमदार अभिमन्यू पवार,देवेंद्र कोठे,अमित गोरखे यांचा समावेश आहे. तसेच अपर आयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय,कोकण हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. अशासकीय सदस्यांमध्ये मनीष मेश्राम,अशोक राणे, ऋषिकेश सकनूर,गुरप्रीत सिंह अहलुवालिया, अश्विनी चव्हाण आणि जयवंत तांबे यांचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय विभागांचे अधिकारीही समितीत सहभागी आहेत.
आज पार पडलेल्या बैठकीत हिंदू समाजातील दहनभूमी व दफनभूमींच्या विषयावर सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सर्व स्मशानभूमी सर्व जातीधर्माच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना सुचविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आले.
समिती राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार असून,त्याआधारे सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. यामुळे स्थानिक गरजांनुसार विकास आराखडे तयार करण्यात मदत होणार आहे.
यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की,राज्यात जिथेही विकासकामांची मागणी केली जाईल,त्या ठिकाणी प्रथम स्मशानभूमी उभारणीस प्राधान्य देण्यात यावे. प्रत्येक गावात सर्व समाज घटकांसाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्मशानभूमींमध्ये पाणी,वीज,वृक्षलागवड,छत,आरसीसी बांधकाम,बसण्यासाठी बाकडे,अप्रोच रस्ता तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावरही विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे,प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले,आमदार देवेंद्र कोठे, अशोक राणे,ऋषिकेश सकनूर,ॲड.गुरप्रीत सिंह अहलुवालिया,अश्विनी चव्हाण,जयवंत तांबे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
