प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर दर्शनी भागात आरोग्य मित्र यांचे नाव व संपर्क क्रमांक असलेला डिस्प्ले बोर्ड लावावा
शासन तरतुदीनुसार धर्मदाय रुग्णालय रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत की नाहीत याच्या माहितीसाठी पथकामार्फत रुग्णालयांची तपासणी करण्यात येणार
सोलापूर : जिल्ह्यात 17 धर्मादाय रुग्णालय कार्यरत आहेत. या सर्व रुग्णालयांनी शासन निर्देशानुसार सर्वसामान्य,गरजू व गोरगरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी निर्देशित केले आहे.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित - धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत समितीचे सचिव धर्मादाय उप आयुक्त ईश्वर सूर्यवंशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ,धर्मादाय निरीक्षक उमेश देशमुख,भागवत फुलसुंदर यांच्यासह समिती सदस्य व धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धर्मदाय उप आयुक्त सूर्यवंशी पुढे म्हणाले की राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व 17 धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधेसह त्यांना व्यवस्थित माहिती देणे आवश्यक आहे. तसेच ज्या कारणासाठी शासनाने रुग्णालयांना मान्यता दिलेली आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रत्येक रुग्णालयांनी करणे आवश्यक आहे. तसेच ज्या कारणासाठी त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत,त्या जागेचा वापर वैद्यकीय सेवा देण्यासाठीच करावा अन्य व्यावसायिक कारणासाठी याचा वापर केला जाणार नाही याबाबतची काळजी घ्यावी,असेही त्यांनी सुचित केले.
धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्याकडील आरोग्य सेवकांना योग्य प्रशिक्षण द्यावे. त्याप्रमाणेच शासनाच्या वतीने नियुक्ती केलेल्या पाच आरोग्य सेवकांनाही ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे तरी संबंधित रुग्णालयाने ह त्यांना फील वरील प्रशिक्षण द्यावे. आरोग्य सेवक व रुग्णालय यांच्यात चांगला समन्वय असला पाहिजे तसेच आरोग्य सेवकांनी रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांना उपचाराच्या अनुषंगाने तसेच त्यांनी विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित सांगावी व योजनेचा क्लेम ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रासह अद्यावत तयार करून द्यावा. संबंधित रुग्णालय योजनेत असलेल्या रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेणार नाहीत याची काळजी घ्यावी असे निर्देश सूर्यवंशी यांनी दिले.
त्याप्रमाणेच प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाच्या बाहेर दर्शनी भागात संबंधित आरोग्य सेवक अथवा आरोग्य मित्र याचे नाव व संपर्क क्रमांक डिस्प्ले बोर्ड च्या माध्यमातून लावावा. तसेच त्या बोर्ड वर टोल फ्री क्रमांक तक्रार निवारण क्रमांक ही उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून तिथे येणाऱ्या गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य मित्राच्या मार्फत सर्व प्रक्रिया वेगाने पार पडता येईल. व रुग्णालयाशी संबंधित तक्रार असेल तर तेही नोंदवता येईल. पुढील पंधरा दिवसात हे डिस्प्ले बोर्ड प्रत्येक रुग्णाला बाहेर लावले जातील याची खात्री महसुल यंत्रणेने करावी,अशा सूचना सूर्यवंशी यांनी दिल्या.
सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये शासन निर्देशाप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत का नाहीत याबाबतची तपासणी संबंधित प्रांत अधिकाऱ्यांच् अध्यक्षतेखाली एक पथक तयार करून करण्यात येईल. या पथकामध्ये तहसीलदार,आरोग्य अधिकारी यांचाही समावेश केला जाईल. हे पथक रुग्णालयांची तपासणी करून त्याचा अहवाल एका महिन्यात देईल,असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले.
यावेळी समिती सदस्य तसेच धर्मादाय रुग्णालयांच्या प्रतिनिधी यांनीही त्यांच्या अडचणी तसेच रुग्णालयामार्फत रुग्णांना चांगली सेवा देण्याबाबत ची माहिती दिली.
