Ticker

6/recent/ticker-posts

रमजानुल मुबारक - २७. अंतिम निकालासाठी तयार रहा



अंतिम निकालासाठी तयार रहा
रमजान महिन्यातील पवित्र अशी शबेकद्र रात्री संपन्न झाली. महिनाभर तरावीहच्या नमाजमध्ये कुरआन शरीफ चे पूर्ण पठन ही पूर्ण झाले. त्यामुळे आता आपली जबाबदारी संपली असे समजून उर्वरित दोन किंवा तीन दिवस तरावीह कडे पाठ फिरवू नये. कुरआन शरीफचे वाचन व पठन पूर्ण होत असतांना रमजान महिना अलविदा होत आहे ही जाणिव प्रत्येकाला होत आहे. कित्येक जणांच्या डोळयात अश्रू दाटले आहेत.रमजान महिना आपल्यातून निघून जात असतांना आपण त्याचे किती पालन केले याचा परामर्श प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता आहे. 


अल्लाहने आपल्याला हा महिना दिला मात्र त्याचे पूर्णतः पालन आपण करु शकलो नाही. कुरआन मध्ये अल्लाहने जीवन कसे जगावे याबाबतचे सखोल मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे जर प्रत्येकाने आपले आचरण ठेवले तर आपले जीवन सार्थ ठरेल. दररोजच्या व्यवहारातील अनेक बाबींबाबत आपल्या कडून कधी मुद्दाम तर कधी अजाणतेपणाने दुर्लक्ष होते. पण असे होणे किंवा करणे योग्य नाही. मोजमापाच्या व्यवहारात देतांना कमी देऊ नका व घेतांना जास्त घेऊ नका कारण तुम्हाला प्रत्येक कृत्याचा हिशोब दयावा लागणार आहे याची जाणिव ठेवूनच प्रत्येकाने वागणे आणि जगणे अपेक्षित आहे. 

रोजच्या जीवनात आपल्याकडून घडणारे प्रत्येक वर्तन हे काळजीपूर्वक केले पाहिजे. जगाचा निर्माता आपल्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे. त्याचे दोन फरिश्ते आपल्या वर्तनाची प्रत्येक बाब दरक्षणी नोंदवित आहेत याची जाणिव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. कुरआन शरीफमध्ये अल्लाहने म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येक बाबीचा हिशोब कयामतच्या दिवशी दयावा लागणार आहे. आपण जे काही कृत्य करतो त्याची नोंद होत असते. भले ते कृत्ये उजेडात करा किंवा गडद अंधारात करा.केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब किंवा जाब प्रत्येकाला दयावा लागेल याबाबत कुणीही शंका बाळगू नये. अल्लाह किंवा ईश्वराने मानव निर्माण केला.जगातील सर्व मानव सारखेच आहेत. प्रत्येकाला दोन हात,दोन कान,एक नाक,दोन पाय देवाने दिले. 

जगातील सर्वांच्या रक्ताचा रंग एकच म्हणजे लाल. देवाने माणूस जन्माला घातला. पण या दुनियेने माणसांची विभागणी जातिधर्मात, पंथात केली. बरं जगातील कोणताही धर्म वाईट शिकवण देत नसतांना माणसं मात्र वाईट वागतात याचेच आश्चर्य वाटते. मागे एक पोस्ट वाचली कि गेल्या वर्षभरात देशात झालेल्या दंगली,संप,मोर्चे,आंदोलने या मुळे देशाचे एक लाख आठशे कोटी रुपयांचे नुकसान झाले. वास्तवतः थोडीशी दूरदृष्टी दाखविली तर हे सर्व टाळता येऊ शकते.दंगली म्हणजे आपल्या देशाला लागलेला शाप होय. यामुळे काहींचा फायदा होत असला तरी समस्त देशाचे,जनतेचे कधीही भरून न येणारे अपरिमित असे नुकसान होते याची जाणिव कुणाला कशी होत नाही याचेच दुःख वाटते. यासाठी प्रत्येकाने नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी म्हणजे या घटना टाळता येऊन माणुसकी दृढ होईल. प्रत्येकाने केलेल्या कृत्याचा हिशोब त्याला लवकरच मिळणार आहे त्यामुळे प्रत्येकाने अंतिम निकाल साठी तयार राहायला हवे. (क्रमश:)
सलीमखान पठाण