सोलापूर : बार असोसिएशन वकीलकेंद्री न राहता सत्ताकेंद्री झालेली असल्याने वकिलांच्या कल्याणाचा विचार उरला नाही. वकिलांचे कल्याण हा एकतर्फी कार्यक्रम खरे तर बार कौन्सिलच्या कामाचा उद्देश असायला पाहिजे, परंतु वकिलांच्या कल्याणाबाबत संपूर्ण निष्क्रियता त्यांनी दाखविली आहे. त्यामुळे यावेळी जास्तीत जास्त नवीन वकील उमेदवारांना व वकील महिलांना बार कौन्सिलवर निवडून द्या असे आवाहन जेष्ठ संविधानतज्ञ ॲड.असीम सरोदे यांनी आज बार्शी बार असोसिएशनच्या वकिलांशी संवाद साधताना केले. यावेळी बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष,जेष्ठ विधिज्ञ,सन्माननीय सदस्य व पदाधिकारी वकील बांधव उपस्थित होते.
पारदर्शकतेची मागणी करणे,सत्तेला प्रश्न विचारणे आणि सत्तेचा खरा चेहरा असंवैधानिक आहे हे सोप्या भाषेत सांगितल्याने माझ्यावर बार कौन्सिलच्या मदतीने गैरवर्तन केल्याचा खोटा ठपका ठेऊन माझी वकिली सनद तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा अनाकलनीय व बेकायदेशीर निर्णय बार कौन्सिलच्या काही सदस्य वकिलांनी घेतला त्या वाईट प्रवृत्तींना नक्कीच विरोध केला पाहिजे. कायदा राजकीय प्रेरणेने शस्त्र म्हणून वापरणारी प्रवृत्ती वकिली व्यवसायाची प्रतिष्ठा मलिन करीत आह,असा घणाघात ॲड.असीम सरोदे यांनी केला.
आपण सगळे वकील मिळून न्यायासाठी, न्यायाचा दर्जा टिकविण्यासाठी व वाढविण्यासाठी एकत्रित काम करीत राहू तरच न्यायव्यस्थेवरील सामान्य लोकांचा दर्जा कायम राहील असा विश्वास शेवटी ॲड.असीम सरोदे यांनी व्यक्त केला. वकिलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्यांनी दिली. सदरचा कार्यक्रम बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष,जेष्ठ विधिज्ञ, सन्माननीय सदस्य,पदाधिकारी वकील यांनी यशस्वी पार पाडला.
